मोठी बातमी: आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश; एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा ऑफलाईन द्या, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. एबीपी माझाच्या बातमीची आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक ठिकाणी शिधा वाटपात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा तात्काळ ऑफलाईन देण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. यात दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा पोहचला आहे, तर अद्याप बऱ्याच ठिकाणी नागरिकांना हा आनंदाचा शिधा मिळालेला नाही. दिवाळी सुरु झाली असतानाही अद्याप अजून बऱ्याच लोकांना हा आनंदाचा शिधा मिळाला नाही. अजूनही बरेच लोक या आनंदाच्या शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. यातच राज्यात काही ठिकाणी याचा काळाबाजार ही सुरु झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात 100 रुपयांच्या या किटची 300 रुपयांना विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात हा प्रकार घडला आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांची फसवणूक करणाऱ्या दुकानदाराविरोधात शहापूर तहसीलदारांकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आनंदाचा शिधाच्या पिशवीवर पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोटो छापण्यास उशीर झाल्याने हा आनंदाचा शिधा वेळेत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. यातच पैठण तालुक्यात एक वेगळा प्रकार समोर आला आहे. पैठणमध्ये वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर स्थानिक आमदार भुमरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर कोणत्याही मंत्र्याने आपल्या मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या आनंदाचा शिधाच्या पिशवीवर आपला फोटो लावलेला नाही. एकीकडे नागरिक या आनंदाच्या शिधाची वाट पाहत असताना सरकारमधील आमदार आणि मंत्री हे आपली प्रसिद्धी करण्यात गुंतलेले आहेत, असेही विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे.
दरम्यान, राज्यात ज्या जिल्ह्यात हा आनंदाचा शिधा पोहोचला आहे, तिथे नागरिकांना एक वेगळ्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना आनंदाचा शिधा मिळण्यास उशीर होत आहे. यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑफलाईन शिधा वाटपाचे आदेश दिले आहेत.