वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Chhatrapati Sambhajiraje : वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. तो बिनधास्त फिरत आहे. इंस्टाग्रामवर फोटो टाकत आहे तरी आपण काही करू शकत नाही, असा हल्लाबोल छत्रपती संभाजीराजे यांनी केलाय.
Chhatrapati Sambhajiraje on Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आज 19 दिवस झाले, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. मोक्का लावतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले त्याचं पुढे काय केलं? तो बिनधास्त फिरत आहे. इंस्टाग्रामवर फोटो टाकत आहे तरी आपण काही करू शकत नाही. अजित पवार इतक्या प्रखरपणे बोलतात, प्रखरपणे मते मागतात. मग हे वाल्मिक कराड जे काही चालले आहे, हे तुम्ही कसे खपवून घेता, असा सवाल त्यांनी अजित पवारांना केला आहे.
बीडला बिहार करायचे आहे का?
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, कोणालाही सोडणार नाही, मात्र कुणीच सापडले नाही, असे विचारले असता छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, हेच दुर्दैव आहे. इतक्या बहुसंख्य लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय. आता ही वेळ आलीय की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी सरकारची आहे. आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही
या घटनेमागे कोण आहे? असे विचारले असता छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, शोधून काढले तर 2 मिनटं लागतात. कराडच्या संपर्कात कोण आहे, त्याचे खास संबंध कुणाशी आहेत? धनंजय मुंडे यांच्याशी आहे. ते स्वतः म्हणतात वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नका, असे मी जाहीरपणे सांगितले होते. वाल्मिक कराडला पकडल्यावर सर्व समोर येईल. धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशिवाय पान हलत नाही हे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा