Anjali Damania On Santosh Deshmukh: संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींचा खून, मला फोन आला; अंजली दमानियांचा धक्कादायक दावा
Anjali Damania On Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Santosh Deshmukh: संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केलाय. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. दरम्यान यासंदर्भात पोलीसांना माहिती दिल्याचही अंजली दमानियांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा सवालही यावेळी अंजली दमानियांनी उपस्थिती केला आहे.
विराट मोर्चाला कोण कोण उपस्थित राहणार?
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये आज विराट मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार आहेत. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही; छत्रपती संभाजीराजे आक्रमक
संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळवून द्यायचे आहे. महाराष्ट्र पुरोगामी विचाराने चालणार राज्य आहे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचे नाव घ्यायला राहिले आहोत का?, कराड मोकाट फिरत आहे, मोका लावतो म्हणाले होते. अजित पवार प्रखर म्हणाले, पण तुम्ही हे कसे खपवून घेता?, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. एक व्यक्तीला घाबरत आहे, कोण आहे यामागे? आपल्याला बीडला बिहार करायचे आहे का?, शोधून काढले तर 2 मिनटं लागतात. कराडच्या संपर्कात कोण आहे. त्याचे खास सबंध कुणाचे आहेत. धमक असेल तर करा, धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका हे सांगणारा मी पहिला आहे. कराडला पकडल्यावर सर्व समोर येईल. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असं संभाजीराजेंनी सांगितले.
वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी-
सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे सीआयडीचं पथक सकाळपासून काम करत आहे. त्यांनी दोन ते अडीच तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते, त्यानंतर त्यासंदर्भातील चौकशीचा भाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.