cabinet expansion: एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, दोन नेते नापास; भरत गोगावलेंच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाची अपडेट
cabinet expansion: महायुतीतील तिन्ही पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यात महायुती सरकारची स्थापना झाली, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे आठवडाभरात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी बैठका, चर्चा आणि गाठीभेटींना वेग आला आहे. मंत्रीपदासाठी आता नेत्यांची चाचपणी सुरू आहे, महायुतीतील तिन्ही पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आलं आहे.
कोणाला संधी कोणाल डच्चू?
राज्यमंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलं आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाल्याच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्री पदासाठी इच्छुक असणारे ५ आमदार पास झाले आहेत.
शिवसेनेचे मंत्री पदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे पास झाल्याची माहिती आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे. या पैकी 10 ते 12 मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्री पदाची शपथ दिली जाणार. तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले आणि मंत्री पदाची शपथ घेणार संभाव्य मंत्र्यांची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
इच्छुकांची यादी बरीच मोठी
यंदा भाजप मंत्र्यांची संख्या दुप्पट होणार असली, तरी इच्छुकांची यादी बरीच मोठी आहे. ज्येष्ठांना बाजूला सारत नव्याने संधी देण्याची भाषा वास्तवात मात्र जिकिरीची आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्यांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपकडून होईल. मूल्यमापन करूनच ज्येष्ठांना संधी देण्याचे भाजपचे धोरण शिवसेनेने मान्य केले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंतांची मंत्रिपदाची वाट बिकट मानली जात होती. उदय सामंत, शंभूराज देसाईंचा रस्ता मात्र मोकळा मानला जात आहे.
अडीच वर्षे मंत्री पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट, भरत गोगावलेंना यंदा संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. संजय राठोड यांची देखील वाट खडतर आहे. किती मंत्री पदे मिळणार याबाबत संभ्रम आहे, मात्र तरी खात्यांवरून शिवसेनेला नमते घ्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः एकनाथ शिंदे यांनाच गृह वरून महसूलपर्यंत यावे लागले. नगरविकासही हाताबाहेर असण्याची शक्यता अधिक. सार्वजनिक बांधकाम, उद्योग, उत्पादन शुल्क, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी आणि परिवहन अशी जुनी खाती शिवसेनेला मिळू शकतात.