भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांची ती यादी फेक, व्हायरल करू नका; रविंद्र चव्हाणांकडून इशारा
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत.

मुंबई : भाजपने संघटन पर्वच्या (BJP) माध्यमातून राज्यात पक्षाची मोट नव्याने बांधण्यास सुरुवात केली असून तब्बल दीड लाख सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी महाराष्ट्रभर फिरुन विविध जिल्ह्यात पदाधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्या सूचनेनुसार राज्यात भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, आता भाजप जिल्हाध्यक्षांची खोटी यादी समाज माध्यमांवर व्हायरल (Social media) झाली असून 81 जिल्हाध्यक्षाची यादी खोटी असल्याचे भाजप नेतृत्वाने म्हटलं आहे. तसेच, ही यादी व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भाजपने दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षबांधणी सुरू केली असून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करत भाकरी फिरवण्याचं काम केलंय.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर भाजपने वरिष्ठ नेते रविंद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने संघटन पर्व अभियान राबवले. त्या माध्यमातून भाजपने तब्बल दीड कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात येत आहे. त्यातच, आता भाजपने राज्यातील सर्वच जिल्ह्यांसाठी भाजपच्या (BJP) 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये, मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी 3 पदे तयारी करण्यात आली आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये, अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि विरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता भाजप जिल्हाध्यक्षांची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
सोशल मीडियावर 'भाजप जिल्हाध्यक्ष 2025' या नावाने फिरणारी 81 जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या फक्त 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून उर्वरित जिल्हांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे, आवाहनही रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
सदरील व्हायरल बनावट यादीत अनेक चुकीची नावं असून, ती यादी हेतु-पुरस्करपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं. या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, बनावट माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही रवींद्र चव्हाणांनी केले आहे.





















