''चित्रा वाघ अन् रुपाली चाकणकरांना महाराष्ट्रातून तडीपार करा; दोघीही असंस्कृत, असभ्य''
महाराष्ट्रात चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे, पक्षाचे नेते, प्रवक्ते आणि पदाधिकारीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) नेत्या विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप केले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांवरही टीका केली होती. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनीही सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. आता, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या हेमा पिंपळे यांनी चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर (Rupali chakanakr) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच, रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांना महाराष्ट्रातून हद्दपार करा, अशी मागणीही केली आहे.
महाराष्ट्रात चित्रा वाघ आणि रूपाली चाकणकर या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बद्दल गरळ ओकण्याचे काम ते करत आहेत. ज्या पद्धतीने त्यांचा आकांडतांडव करत आहे, ते पाहून असं वाटतं की, त्यांना कुठली तरी सापशिडी वापरुन राजकारणात काही कमावायचं आहे. त्यामुळे, या दोघी असंस्कृत, असभ्य महिलांना महाराष्ट्रातून तडीपार करावं अशी मागणी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी केली. या दोघींचेही महाराष्ट्रात काम नाही. या दोघी सतत दात काढून चवताळत असतात. त्यामुळे त्यांना गुजरातमध्ये पाठवावं आणि त्यांनी गुजरातचे राजकारण करावं, असेही हेमा पिंपळे यांनी म्हटलंय.
चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, तो त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही चित्रा वाघच्या कुटुंबात शिरतोय का, चित्रा वाघच्या कुटुंबात शिरल्यावर चित्रा वाघला पळता भुई थोडी होईल. मूळ आवळली, मूठ आवळली असं त्या म्हणतात, अहो मग मूठ खोला ना, असे आव्हानही पिंपळे यांनी चित्रा वाघ यांना दिले. तर, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले, असे रुपाली चाकणकर म्हणतात, पण सुप्रियाताईंच्या मागे फिरुन फिरुन तुझ्या चपला झिजल्या, हे रुपाली विसरली, अशा शब्दात हेमा पिंपळे भाजप नेत्या चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर
सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केल होता. सुप्रिया सुळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्या हास्यास्पद विधानं करत असल्याचेही चाकणकर यांनी म्हटले होते.
हेही वाचा
मोठी बातमी! आता UPSC च्या प्रमुखपदी डॅशिंग महिला अधिकारी, प्रीति सूदन यांना जबाबदारी