(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashok Chavan: काँग्रेस पक्षाचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत, अशोक चव्हाण म्हणाले...
Ashok Chavan: मी काँग्रेस पक्षात असताना प्रामाणिकपणे काम केले, कोणतीही गद्दारी केली नाही. इतक्या वर्षानंतर आता मला वेगळा पर्याय शोधावासा वाटत आहे.
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.
यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करुन पुढची दिशा ठरवेन. मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.
पक्षाने मला खूप दिलं, पण मीदेखील पक्षासाठी खूप केलंय: अशोक चव्हाण
काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप काही दिले आहे, तरीही तुम्ही पक्ष का सोडताय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी म्हटले की, अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं हे खरं आहे, पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलंय. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केले नाही, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला, यावर अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली. मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
आणखी वाचा