Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळताच अंजली दमानिया कडाडल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी करत म्हणाल्या...
Anjali Damania on Dhananjay Munde : मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना कृषी विभागातील घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. यावर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Anjali Damania on Dhananjay Munde : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयास विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे. मला यामध्ये काय त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहेत. शासनाकडचे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असं त्यांनी मांडलं. वकिलांनी जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चार देखील करण्यात आला नाही.
धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नाही
भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाला चॅलेंज करायची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. वी राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठ वेळा सचिवाने सांगितलं की, हे सर्व चुकीचं होतं आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अंजली दमानियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अंजली दमानिया पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये. देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, पहिले धनंजय मुंडे नंतर माणिकराव कोकाटे असे कृषीमंत्री झाले. याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी, सरकारी वकिलांचा घोळ, त्यामुळे सगळं त्यांच्या पथ्यावर पडलं, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा
Dhananjay Munde Speech : वैर माझ्याशी होतं, माझ्या मातीची बदनामी का? धनंजय मुंडेंचं 200 दिवसांनी विरोधकांना शेरोशायरीतून उत्तर; म्हणाले, जुबान काट लो लहजा...























