Ajit Pawar: आता संघर्ष थांबायला हवा, रायगडचा राजकीय वणवा शमवण्यासाठी अजित पवार मैदानात; तटकरे-गोगावले वाद मिटणार?
Ajit Pawar: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष आता थांबायला हवा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

Ajit Pawar: रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena) यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष आता थांबायला हवा, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली आहे. रायगडमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी थेट मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची बैठक घेतली.
Ajit Pawar: बैठकीत नेमकं काय घडलं?
या बैठकीत दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले जाऊ नयेत, याची काळजी घ्यावी अशी विनंती अजित पवार यांनी केली. गोगावले आणि सामंत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधला. या चर्चेतही वाद वाढायला नको, खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती अजित पवारांकडून अनौपचारिक चर्चेत देण्यात आली आहे.
Bharat Gogawale: भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार भरत गोगावले म्हणाले, “अजित दादांनी अशी भावना व्यक्त केली असेल, तर त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही समजावून सांगावे. एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करणे योग्य नाही. अशा प्रकारे व्हिडिओ दाखवून बदनामीच होते. दादा एक पाऊल पुढे आले, तर आम्ही दोन पावले पुढे यायला तयार आहोत. मात्र पुढे जर दगा-फटका झाला, तर ‘तब का तब देखेंगे’. आम्हालाही वाद वाढवायची हौस नाही. आरोप-प्रत्यारोप राजकारणाचा भाग आहे, पण तथ्य नसताना बदनामी केली जात असेल, तर त्याचा शोध वरिष्ठांनी घ्यावा,” असे त्यांनी म्हटले आहे.
Raigad Shiv Sena vs NCP: रायगडमधील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना अपेक्षित असतानाच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुतीतच अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही ठिकाणी शिवसेना–राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध भाजप अशी समीकरणे तयार झाली. विशेषतः रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा सामना थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी झाल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळालेला नाही. शिंदे गटाच्या तिन्ही आमदारांचा पालकमंत्रीपद तटकरे कुटुंबाकडे देण्यास तीव्र विरोध आहे. सुनील तटकरे यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे हे पद जाऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी घेतली आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे, अशी भूमिका शिवसेनेच्या आमदारांची आहे. रायगडमधील शिवसेना, राष्ट्रवादी वाद हा अधिक गुंतागुंतीचा बनला आहे.
Mahendra Dalvi Cash Video: कॅशबॉम्ब व्हिडिओवरून आरोप-प्रत्यारोप
दरम्यान, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक ‘कॅशबॉम्ब’ व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ कॉल असल्याचा दावा करण्यात आला होता, ज्यामध्ये नोटांच्या बंडलांचा आणि एका अस्पष्ट व्यक्तीचा उल्लेख होता. या व्हिडिओवरून शिंदे गटाने आक्षेप घेतला असून, ही क्लिप मॉर्फ केलेली असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच अंबादास दानवे यांना पाठवल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
Ajit Pawar: अजित पवारांकडून वाद शमवण्याचा प्रयत्न
या पार्श्वभूमीवरच अजित पवार यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीतील अंतर्गत वाद वाढू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. आता अजित पवारांच्या मध्यस्थीनंतर रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वाद शमणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
























