अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं 'कॅंडिडेट कनेक्ट' अभियान सुरू; उमेदवाराचा प्रवास अन् विकासावर फोकस
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून या मोहिमेची सुरुवात केली.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच राजकीय पक्षांच्या प्रचाराने व तयारीने वेग घेतला आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. तत्पूर्वीच, राजकीय पक्षाकडून रणनीती व प्रचारनीती आखण्यास सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) उमेदवारांना मतदारांशी जोडण्यासाठी 'कॅंडिडेट कनेक्ट' मोहीम सुरू केली आहे. वैयक्तिक व्हिडिओ क्लिप्स शेअर करून प्रचारात उमेदवारांचा राजकीय प्रवास आणि विकासाचे प्रयत्न अधोरेखित करण्यात आले आहेत. या अभियानाच्या माध्यमातून मतदारांना आपले उमेदवार आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती देण्याचा पक्षाचा उद्देश आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या राष्ट्रवादीची जोरात प्रचारमोहिम सुरू आहे.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून या मोहिमेची सुरुवात केली. या अभियानांतर्गत पक्षाने उमेदवारांच्या व्हिडिओ क्लिप शेअर करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल बोलतात, वैयक्तिक किस्से, आवड, त्यांचा राजकीय प्रवास, अजित पवार यांनी त्यांच्या भागातील लोककल्याणकारी कामांना कसे समर्थन दिले आणि त्यांच्या नेतृत्वाबद्दल देखील सांगितले आहे . पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये उमेदवार आपल्या मित्र आणि कुटुंबियांबद्दलच्या वैयक्तिक गोष्टी आणि त्यांच्यासोबतचे संस्मरणीय क्षण देखील शेअर करतात.
वेळ-काळ प्रसंग कितीही अवघड असू दे, पण धीरगंभीरपणे कामं जो मार्गी लावतो, जनसेवेस तत्पर राहतो, तोच खरा लोकप्रतिनिधी म्हणायचा!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 16, 2024
जसे आपले श्री. शेखर गोविंदराव निकम!@ShekharGNikam99#CandidateConnect #कॅंडिडेट_कनेक्ट #Chiplun pic.twitter.com/2fi6a7WDpb
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करत अजित पवार यांनी त्यांना 'जनतेचा खरा प्रतिनिधी' असे संबोधले आहे. आणखी एक व्हिडिओ उदगीरचे आमदार आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याशी संबंधित आहे. संजय बनसोडे यांची बांधिलकी आणि प्रयत्नांचे कौतुक करताना उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना 'विकासाची भूक असलेला' लोकप्रतिनिधी असे संबोधले. जनतेच्या सेवेत निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या भूमिकेवर या मोहिमेत भर देण्यात आला आहे. अजित पवार म्हणाले, 'जनतेचा खरा प्रतिनिधी तोच असतो, जो जनतेसाठी उभा राहतो, त्यांच्या सुख-दु:खाला स्वत:चा मानतो, तो जनतेच्या सेवेच्या तीव्र तळमळीने प्रेरित असला पाहिजे.'. अजित पवारांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच, उमेदवारांबद्दल गौरवास्पद माहिती देत त्यांच्या उमेदवारीचा सन्मानही केल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकप्रतिनिधी असावा जनसामान्यांत ऊठ-बस करणारा,
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 17, 2024
लोकप्रतिनिधी असावा सर्वसामान्यांची सुख-दुःख आपला मानणारा,
लोकप्रतिनिधी असावा विकासाची भूक असणारा,
लोकप्रतिनिधी असावा तळमळीनं लोकांसाठी झिजणारा...
जसा आपला संजय बनसोडे!@BansodeSpeaks #CandidateConnect #कॅंडिडेट_कनेक्ट #Udgir pic.twitter.com/GQkGKHGs4b