परभणीत स्विफ्ट अन् ट्रॅव्हरलचा अपघात, बुलेटही धडकली; विचित्र अपघातात 14 जखमी, 2 गंभीर
गंगाखेड ते परभणी रस्त्यावर संत जनाबाई प्रवेशद्वाराजवळ हा भीषष तिहेरी अपघात झाला असून 14 प्रवाशी जखमी झाले आहेत.
परभणी : जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. बुलेट, स्विफ्ट डिझायर आणि टेम्पो ट्र्रॅव्हल यांचा तिहेरी अपघात (Accident) झाला. त्यामध्ये एकाच कुटुंबातील अनेकजण जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार आणि टेम्पोची जोरदार धडक बसली असून स्विफ्ट कारच्या समोरील भागाचा चुराडा झाल्याचं दिसून येत आहे. तर, ट्रॅव्हरल टेम्पोचा समोरील भागही अपघातात चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे. अपघातात बुलेटचेही नुकसान झाले असून बुलेटचालकही गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धावे घेतली. त्यानंतर, पोलिसांनाही अपघाताची माहिती देत जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
गंगाखेड ते परभणी रस्त्यावर संत जनाबाई प्रवेशद्वाराजवळ हा भीषष तिहेरी अपघात झाला असून 14 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींमध्ये 2 बालकांचाही समावेश आहे. गंगाखेडमधील प्रताप यशवंतराव मुंडे हे बुलेटवरुन व सुनील नामदेवराव राठोड हे स्वीफ्ट डिझायर या कारने परभणीकडे निघाले होते. त्यावेळी परभणीहून गंगाखेडमार्गे परळीकडे एक टेम्पो ट्रॅव्हल निघाला होता.या तिन्ही वाहनांची संत जनाबाई प्रवेशद्वाराजवळ जोरदार धडक झाली. त्या धडकेत टेम्पो ट्रॅव्हलमधील एकाच कुटूंबातील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामधील सर्वच प्रवाशी हे नाशिक जवळील पंचवटीचे रहिवाशी आहेत. या अपघातात बुलेटवरील सुदाम रतन राठोड (वय 45) हे देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या तिहेरी विचित्र अपघाताचे वृत्त कळाल्याबरोबर गंगाखेड नाक्यावरील काहींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, अपघातातील दोन गंभीर जखमींवर गंगाखेडमध्ये प्रथमोपचार करुन परभणी व नांदेडला हलवण्यात आले आहे.