Video: अहमदाबाद दुर्घटनेनं आठवणी जागल्या, आमदार, नगराध्यक्षांनी मारल्या होत्या उड्या; 1993 ची विमान दुर्घटना
गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमध्ये अपघातग्रस्त विमानातील एक प्रवासी नशिब बलवत्तर म्हणून बचावला

परभणी : अहमदाबाद विमान दुर्घटनेनं (Ahmedabad plane crash) देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून मृत्युमुखी पडलेल्या 241 प्रवाशांसह नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावेलल्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून देवा, अशी वेळ कोणाच्याही वाटेला नको येऊ दे रे बाबा.. अशी आर्त हाक अनेकांच्या ह्रदयातून येत आहे. तर, या दुर्घटनेनंतर काही जणांकडून आपणासोबत घडलेल्या विमान प्रसंगातील अशाच आठवणी जागवल्या जात आहेत. 26 एप्रिल 1993 रोजी अशाच प्रकारची विमान दुर्घटना संभाजीनगर (Sambhajinagar) परिसरात घडली होती. त्या दुर्घटनेत विमानातील (airplane) 55 प्रवासी सुदैवाने बचावले होते, तर 55 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या विमानातून मुंबईला शरद पवारांच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि नगराध्यक्ष वसंतराव शिंदे हे संभाजीनगर येथून निघाले होते. सुदैवाने हे दोन्ही नेते बचावले होते. त्याच, वसंतराव शिंदेंनी जुन्या आठवणींना उजाळा देत अहमदाबादच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथील विमानतळावर विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमध्ये अपघातग्रस्त विमानातील एक प्रवासी नशिब बलवत्तर म्हणून बचावला, इतर सर्वच्या सर्व प्रवाशांचा जीव गेला. एअर इंडियाच्या बोईंग विमानातील तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने देश शोक सागरात बुडाला असून अनेकांनी यापूर्वीच्या विमान दुर्घटनाच्या आठवणी जागवल्या आहेत. या दुर्दैवी घटनेने 32 वर्षापूर्वी घडलेल्या अशाच विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेची आठवण करून दिली आहे.
आमच्या विमानाने टेक ऑफ करताना सर्वप्रथम विमानाचं चाक एका कापसाने भरलेल्या ट्रकच्या कोपऱ्याला धडकलं. त्यानंतर, पुढे हेलकावे घेत वरुड शिवारात हे विमान महावितरणच्या इलेव्हन केव्ही लाईवर आदळलं. या दुर्घटनेत पुढे कॉकपीटमध्ये असलेले प्रवासी बचावले, तर पाठीमागे असलेले प्रवासी होरपळले होते. 26 एप्रिल 1993 रोजी घडलेल्या या दुर्घटनेत 55 प्रवासी बचावले, त्यात आम्हीही होतो, असे तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी सांगितले. सन 1993 साली त्यावेळचे औरंगाबाद आणि आताचे संभाजीनगर येथील विमानाचाही भीषण अपघात झाला होता. जयपूर-संभाजीनगर-मुंबई या विमानाचा अपघात देखील अंगावर शहारे आणणारा होता, अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रमाणेच तोही भीषण, भयंकर आणि नातेवाईकांचा आक्रोश दर्शवणारा अपघाता ठरला होता. संभाजीनगरमधील या विमान अपघातात 55 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 40 ते 50 प्रवासी सुदैवाने बचावले होते. त्यात परभणीच्या जिंतूरचे तत्कालीन आमदार रामप्रसाद बोर्डीकर, तसेच तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे यांचाही समावेश होता.
30 फुटावरुन मारल्या उड्या
या दोघांसह इतर 40 ते 50 प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी 30 ते 40 फुटांवरून उड्या मारल्या होत्या. कालची घटना घडली आणि येथील विमानातून उडी मारणाऱ्या वसंतराव शिंदे यांच्यासमोर ती घटना पुन्हा उभी राहिली. त्या विमान अपघाताच्या घटनेची आठवण झाल्यासही अंगावर काटा आला, असं ते सांगतात. अहमदाबाद दुर्घटनेनंतर शिंदे यांनी 1993 च्या त्यावेळच्या विमान अपघाती घटनेचा अनुभव सांगितला.
हेही वाचा
कलेक्टर सकाळीच पायऱ्यावर येऊन बसले; 10 वाजेपर्यंत केवळ 3 कर्मचारी हजर, 30 जणांची पगारकपात
























