Virar : बेडरूमच्या खिडकीतून पडून चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आई-वडील सावरले अन् डोळे दान करण्याचा धाडसी निर्णय
Virar Accident : घरात एकटीच असलेल्या चार वर्षाच्या बालिकेला आई कुठेच दिसली नसल्याने तिने खिडकीच्या बाहेर वाकून बघण्याचा प्रयत्न केला आणि तिचा तोल गेला.
पालघर: विरारमध्ये (Virar Accident) चौथ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून पडून एकुलत्या एक चार वर्षीय लहानगीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र मुलीचा अचानक अपघाती मृत्यू झाला तरीही तिच्या आई-वडिलांनी एक मोठा धाडसी निर्णय घेऊन तिचे डोळे दान केले आहेत.
दर्शनी सुरेश शालियान असे मृत्यू झालेल्या चार वर्षाच्या चिमुरडीचे नाव असून, विरार पश्चिमेच्या बचराज या 19 मजल्याच्या हाय प्रोफाइल इमारतीत ते रहात होते. आज सकाळी ही दुदैवी घटना घडली आहे. या इमारतीत हे कुटुंब भाड्याने राहत होते. वडील मुंबईला कामाला जात असल्याने आई मुलीला एकटीच झोपेत घरी सोडून वडिलांना रेल्वे स्टेशनवर सोडायला गेली होती. घरात झोपलेल्या मुलीला जाग आल्यावर तिने आपल्या आईला रूममध्ये इतरत्र पाहिले. पण आई दिसली नसल्याने तिने बेडरूममधील बेडवर उभं राहून खिडकीतून इमारतीच्या खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. खाली वाकून पहाताना तिचा तोल गेला आणि मुलगी खाली पडली. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
बिल्डिंग बांधली पण सुरक्षा ग्रील नाहीत
बिल्डरने 19 मजल्याची इमारत बांधली पण त्याने बेडरूमच्या खिडकीला सुरक्षात्मक ग्रील बसवल्या नव्हत्या. त्याचबरोबर फ्लॅट मालकांनीही त्या बसवल्या नव्हत्या. पण जर आई वडिलांनी आपल्या चिमुरडीला घरी एकटचं सोडले नसतं आणि जरी सोडलं तरी खिडकीला सुरक्षात्मक लोखंडी ग्रील असती तर आज या चिमुरडीचा जीव वाचला असता.
या चिमुरडीच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. मात्र तिचे डोळे दान करण्याच्या निर्णयाने आई वडिलांच कौतुक ही होतं आहे.
खेळता खेळता लहान मुलगा स्कूटरवर आदळून रिक्षाच्या चाकाखाली
विरारमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. अर्नाळा गावात पळत सुटलेल्या एका लहान मुलाचा भीषण अपघात झाला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अर्नाळा कोळीवाडा किल्ला रोड ते पारनाका या मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. तीन मुलं मुख्य रस्त्याकडे पळत येत असताना एक मुलगा वेगात येणाऱ्या स्कुटीवर आदळून, समोर येणाऱ्या रिक्षाच्या समोरील चकाखाली आला. दैव बलवत्तर म्हणून मुलगा वाचला असून तो किरकोळ जखमी झाला. स्थानिकांनी मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं.
ही बातमी वाचा: