(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zika Virus : पालघरमध्ये झिका व्हायरसचा रुग्ण सापडला, सात वर्षीय मुलीला लागण झाल्याचं स्पष्ट
Palghar: डहाणू आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या झाई आश्रम शाळेतील सात वर्षीय विद्यार्थिनीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
पालघर: जिल्ह्यातील झाई गावातील आश्रम शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीला झिका (Zika Virus) व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत या मुलीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्या अहवालानंतर या मुलीला झिकाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. सध्या या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती आहे. राज्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा दुसरा रुग्ण सापडला आहे.
पालघरमधील झाई आश्रम शाळेतील एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा सहा दिवसापूर्वी ताप आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर एकूण 13 विद्यार्थ्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यापैकी एका सात वर्षीय विद्यार्थिनीच्या रिपोर्टमध्ये झिका व्हायरस आढळून आला आहे. व्हायरसची प्रमुख लक्षणं ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला अशी आहेत. सध्या या विद्यार्थिनीवर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे
पालघरमध्ये झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात सर्व्हेक्षण, कीटक व्यवस्थापन उपचार आणि आरोग्य शिक्षण अशा प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बेलसरमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. आता त्यानंतर पालघरमध्ये दुसरा रुग्ण आढळला आहे.
काय आहे झिका आजार?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना आरोग्य विभागाने निर्देश दिले आहेत.