पालघरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; व्हेंटिलेटर न लावल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
Palghar Corona Updates: पालघरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. व्हेंटिलेटर न लावल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.
Maharashtra Palghar Corona Updates: सध्या देशासह राज्यात कोरोनानं (Corona) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अशातच पालघरमध्येही (Palghar Corona Updates) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यात (Palghar District) सध्या 98 कोरोनाबाधितांवर (Covid-19 Updates) उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका रुग्णाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पण वेळेत व्हेंटिलेटर न लावल्यामुळेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा (गुरुवारी) मृत्यू झाला. पण रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. कोरोनाबाधित महिलेला बुधवारी संध्याकाळी व्हेंटिलेटर उपलब्ध करुन न दिल्यानं तिचं निधन झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात परिसरातील वाळवा या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्यानं त्यांना पालघर रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना त्यांचा त्रास आणखी वाढू लागला आणि महिलेचा मृत्यू झाला. पालघर शहरातील ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेल्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटल येथे दोन रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सदर महिला ही खूप गंभीर अवस्थेत असल्यानं व्हेंटिलेटर लावण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश बोदाडे यांनी दिलं आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरत आहे. तसेच, रुग्णालयाकडून व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याच्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे आरोग्य विभाग कोरोनाबाबत गंभीर नसल्याचं बोललं जात आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
पालघर जिल्ह्यात सध्या 98 कोरोना बाधित रुग्ण यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये पालघरच्या ग्रामीण भागात 98 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 29 रुग्णवर उपचार सुरू होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरासरी 7 रुग्ण तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 5 दैनंदिन रुग्णांची नोंद केली जात आहे. तर या आठवड्यात ग्रामीण भागात 1 तर वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 8, असे एकूण 9 रुग्ण दररोज आढळून येत आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण पालघर तालुक्यात असून ही संख्या 37 आहेत. त्याखालोखाल डहाणू तालुक्यात 4 तलासरी तालुक्यात एक, विक्रमगड तालुक्यात एक आणि वाडा तालुक्यात एक, असे जिल्ह्यात ग्रामीण भागांत गुरुवारपर्यंत 44 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ही संख्या 65 झाली आहे.