(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News : सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संशयिताला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Osmanabad News Update : तुळजापूर येथील सहा वर्षीय मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
Osmanabad News Update : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) येथील सहा वर्षीय मुलीवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार (Sexual Assault ) करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ( Collectorate office ) मोर्चा काढला. मोर्चेकरी महिला यावेळी आक्रमक झाल्या, या महिला जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून कार्यालयाच्या आवारात घुसल्या. त्यामुळे काही वेळ प्रशासनाची तारांबळ उडाली. या वेळी आंदोलकांनी अप्पर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
कायदा फाशी देत नसेल तर आरोपीला आमच्या स्वाधीन करा, आम्ही फाशी देतो असा आक्रमक पवित्रा यावेळी महिलांनी घेतला. लघुशंकेला गेलेल्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तुळजापूर जवळच्या एका गावात ही धक्कादायक घटना 30 ऑगस्ट रोजी घडली आहे. सहा वर्षीय मुलीवर 35 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
सोलापूर रोड वररील एका गावात सहा वर्षीय मुलगी घरा समोर खेळत होती. खेळता-खेलथा ती लघुशंकेसाठी घराच्या पाठिमागे गेली होती. यावेळी माळुंब्रा येथील 35 वर्षीय नराधमाने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी जोरात ओरडल्याने शेजारच्या शेतात काम करणाऱ्या महिला मुलीकडे धावून आल्या. त्या वेळी संशयित आरोपी नग्न अवस्थेत सापडला. महिलांनी त्याला चोप देवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
संशयिताने पीडित मुलीच्या गुप्तांगावर वार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. या मुलीला तुळजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला उस्मानाबाद येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील करत आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्त करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या