(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dawood Ibrahim : NIA कडून दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर; छोटा शकील, मेमनवर ही बक्षीस
Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरोधात एनआयएने बक्षीस जाहीर केले आहे.
Dawood Ibrahim : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या साथीदारांवर बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएने दाऊद आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांविरोधात याआधीच गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर एनआयएने दाऊद आणि त्याच्या टोळीतील इतर गँगस्टरविरोधात बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद विरोधात 25 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर, त्याचा विश्वासू सहकारी समजला जाणऱ्या छोटा शकीलवर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना आणि टायगर मेमनवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपास यंत्रणेकडून याचा तपास सुरू आहे.
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र संघाने दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे. त्याशिवाय भारतातही दाऊदविरोधात दहशतवाद प्रतिबंध कायद्यानुसार (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवण्यात येत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. दाऊद इब्राहिमकडून डी-कंपनी ही टोळी चालवण्यात येते. यामध्ये हाजी अनिस उर्फ अनिस इब्राहिम शेख, शकील शेख उर्फ छोटा शकील, जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, इब्राहिम मुश्ताक अब्दुल रझाक मेमन उर्फ टायगर मेमन आणि इतरांचा टोळीत समावेश आहे.
हे सर्व आरोपी गुन्हेगारी, दहशतवादी कृत्यात सामिल आहेत. यामध्ये शस्त्रांची तस्करी, नार्को टेररिझम, अंडरवर्ल्ड क्रिमिनल सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, दहशतवादी कृत्यासाठी आर्थिक मदत उभारणे आदी कृत्यांचा समावेश आहे. त्याशिवाय ही टोळी लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांसोबत दहशतवादी कृत्यात सामिल असल्याचा आरोप एनआयएने केला आहे.
काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एनआयएने मुंबईत काही ठिकाणी छापेमारी केली होती. हे छापे दाऊद इब्राहिमशी संबंधित ठिकाणे, त्याच्या निकटवर्तीयांवर होते. या छापेमारीत तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. त्यानंतर एनआयएने काहींना अटक केली होती. एनआयएने सलीम फ्रूटला अटक केली. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा मेव्हणा आहे. काही दिवसांपूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलीम फ्रूट हा अनिस इब्राहिमच्या मुलीच्या लग्नात पत्नीसह सामिल झाला होता. या लग्नात दाऊदसाठी खास सूट, अनिसच्या मुलीसाठी दागिने नेण्यात आले होते. मात्र, सलीम फ्रूटने या आरोपांचा इन्कार केला असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: