आचारसंहिता सुरु असतानाच 50 कोटींच्या कामाला मंजुरी, दोषींवर कारवाई करा, माहीती अधिकार कार्यकर्ते गलगलींची तक्रार
लोकसभेची आचारसंहिता (code of conduct) सुरु असताना 50 कोटी रुपयांची निविदा खुली करण्याचं काम नवी मुंबई महानगर पालिकेच्याशहर अभियंता विभागानं केलंय. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अनिल गलगलींनी केलीय.
नवी मुंबई : लोकसभेची आचारसंहिता (code of conduct) सुरु असताना 50 कोटी रुपयांची निविदा खुली करण्याचं काम नवी मुंबई महानगर पालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) शहर अभियंता विभागानं केलं आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी निवडणूक आयोगासह महानगरपालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केलीय. यावर आता पालिका आयुक्त काय भुमिका घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चौकशी करुन संजय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी आचारसंहिता असताना संजय देसाई यांनी 50 कोटी रुपयांची निविदा मंजूर करुन कंत्राटदाराला कार्यादेश दिल्याची तक्रार करुन हे प्रकरण उघडकीस आणले आहे. आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत 50 कोटींच्या कामाची निविदा उघडून विशिष्ट ठेकेदाराला फायदा होईल असे काम संजय देसाई यांनी केले आहे. निवृत्तीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना वादग्रस्त माजी शहर अभियंता देसाई यांनी अनेक निविदा मंजूर करून घेतल्या आहेत. या कामांची चौकशी करुन संजय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.
देसाई हे कायम वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, या घटनेची लेखी तक्रार ठाणे लोकसभेच्या निवडणूक अधिकारी आणि नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता म्हणून नेमणूक झालेल्या संजय देसाई यांना मुदत उलटून देखील निवृत्तीपर्यंत याच पदावर कायम ठेवण्यात आले होते. या पदावर असताना संजय देसाई यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या विरोधात केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी देखील चौकशीची मागणी केली होती. यानंतरही प्रशासनाने त्यांच्यावर वरदहस्त कायम ठेवल्यानं देसाई हे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडले.
घणसोली येथील पाम बीच रस्त्याच्या निर्मितीचे काम पुन्हा एकदा अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीस मिळालं आहे. संजय देसाई यांनी एका विशिष्ट कंपनीस केलेली उघड मदत आणि आचारसंहितेचे केलेले उल्लंघन याविरोधात तक्रारीत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 4 जून 2024 नंतरही ही निविदा उघडली पाहिजे होती. मात्र देसाई यांनी ही निविदा 29 मे 2024 रोजी उघडल्याने याबाबत देखील आश्चर्य अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. मागील कित्येक वर्षांपासून प्रभारी शहर अभियंता पदांवर आरूढ संजय देसाई यांची निवडणूक पूर्वी बदली का करण्यात आली नाही? असा सवालच आता उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपच्या स्थानिक नेत्यानेही केली तक्रार
भाजपचे स्थानिक नेते विजय घाटे यांनी देखील नवी मुंबई शहरातील विविध कामांच्या दर्जाबाबत थेट आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. मान्सून पूर्व कामे, गरज नसताना शहरात काढलेली करोडोंची रस्त्यांच्या निविदा, प्रारूप विकास आराखडा याबाबत चौकशीची मागणी विजय घाटे यांनी केली आहे. पुनर्बांधणी प्रकल्प शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून यासाठी राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेची माहिती आयुक्तांना देण्यात आली आहे. दरम्यान याबाबत महानगर पालिका शहरअभियंता शिरीष आरदवाड यांना विचारले असता, संबंधीत निविदा उघडली असली तरी पुढील प्रक्रिया झाली नसल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
Navi Mumbai : नवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल; वीजपुरवठा पूर्ववत कधी होणार?