वाशी APMC संचालकाच्या अटकेनंतर इतरांवर अटकेची टांगती तलवार, निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
Navi Mumbai APMC Scam : या प्रकरणामध्ये एक आरोपी असलेले शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत.
नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सार्वजनिक शौचालय टेंडर प्रकरणी फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक झाली आहे. क्राईम ब्रॅन्च कडून संजय पानसरे यांना अटक झाली असून इतरही संचालकांवर अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी सातारा लोकसभेचे उमेदवार शशिंकांत शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन घेतल्याने त्यांची अटक टळली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहेत.
एपीएमसीमधील सार्वजनिक शौचालय चालवायला द्यायचे टेंडर 2018 रोजी काढण्यात आले होते. सुरेश मारू या ठेकेदाराला हे काम मिळाले होते. या ठेकेदारांने वेगवेगळ्या संस्थांच्या नावाने फळ आणि भाजीपाला मार्केट मध्ये 12 सार्वजनिक शौचालय चालविण्यास घेतली होती. यापोटी महिन्याला एका शौचालयामागे दीड ते 3 लाख रूपये एपीएमसी प्रशासनाला ठेकेदार देणार होता. सार्वजनिक शौचालये चालविण्याचा ठेका आपल्यालाच मिळावा यासाठी ठेकेदार सुरेश मारू याने आव्वाच्या सव्वा भाड्याचे दर लावून टेंडर मिळवले होते.
सात कोटी 61 लाखांची थकबाकी
एकदा आपल्याला ठेका मिळाला की एपीएमसी मधील संचालकांना हाताशी धरून प्रशासनावर दबाव टाकून भाडेपोटी भरावी लागणारी रक्कम कमी करून घेण्याची पद्धत सुरेश मारू याने आत्मसात केली होती. मात्र एपीएमसीवर मधल्या काळात संचालक मंडळाच्या जागी प्रशासक बसल्याने भाड्याची रक्कम कमी करता आली नाही. यामुळे सुरेश मारू याने टेंडर मध्ये कोट केलेले भाडे एपीएमसी प्रशासनाकडे न भरल्याने 7 कोटी 61 लाखाची थकबाकी तयार झाली.
सात आरोपी फरार
या सर्व प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर क्राईम ब्रॅन्चकडून याचा गेल्या तीन वर्षापासून तपास सुरू होता. 7 कोटी 61 लाख रूपये थकबाकी होवूनही ठेकेदाराला पाठीशी घालण्यात एपीएमसीच्या संचालक मंडळाचा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचा हात असल्याचे तपास पुढे आल्यानंतर 13 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील 5 जणांना अटक करण्यात आली असून 7 फरार आहेत. तर शशिकांत शिंदे यांनी दोन महिन्यांन पूर्वीच अंतरिम जामीन घेतला आहे.
फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांना अटक
याप्रकरणी फळ मार्केट संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे. तर भाजी मार्केट संचालक शंकर पिंगळे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कांदा बटाटा मार्केट संचालक अशोक वाळूंज यांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेने केलेली चौकशी ही फक्त 2018 नंतरच्या प्रकरणातील असून शौचालय घोटाळा हा 2005 पासून सुरू असल्याचा आरोप वकील संतोष यादव यांनी केलाय.
एपीएमसीमधील सार्वजनिक शौचालये भाड्याने देताना अत्यल्प भाडे वसूल करून ठेकेदारांना फायदा होईल अशी धोरणे संचालक मंडळे राबवीत असल्याने प्रशासनाचे करोडो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेला घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी यादव यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
सध्या लोकसभा निवडणूका लागल्या असून यातील एक आरोपी असलेले शशिकांत शिंदे हे सातारा मधून शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. तर संचालक संजय पानसरे हे शरद पवारांच्या जवळचे आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत या प्रकरणाचा तपास करून अटकेची कारवाई केली जात असल्याने पोलीसांच्या भुमिकेवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
ही बातमी वाचा: