Navi Mumbai Metro : नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली, स्थानकं, तिकिट दर ते वैशिष्ट्ये सर्व माहिती एका क्लिकवर
Navi Mumbai Metro : मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नवी मुंबईची मेट्रो सेवा अखेर सुरु झाली आहे. दरम्यान बेलापूर ते पेंधार या स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली.
नवी मुंबई : नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो (Metro) सेवा अखेर सुरु झालीये. गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार आज म्हणजे शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. यावेळी सिडकोचे जॉईंट एमडी कैलाश शिंदे , नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोची वाट पाहत होते. नवी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये ही मेट्रो धावणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना दिवाळीची भेट मिळाली असून आता सुखकर प्रवास करण्यात प्रवाश्यांना सोपं होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार होतं, परंतु काही कारणास्तव सातत्याने हे उद्घाटन पुढे जात होतं. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विना उद्घाटन ही मेट्रो सुरु करण्याचे आदेश दिले. 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. पण त्यानंतरही ही मेट्रो सुरु होण्याकरिता काही केल्या मुहूर्त लागत नव्हता.
कोणत्या स्थानकांचा समावेश?
नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.
मेट्रोच्या तिकीटाचे दर किती? Navi Mumbai Metro Ticket Price
शून्य ते दोन किमीच्या टप्प्याकरिता 10 रुपये तिकीट दर आहे. 2 ते 4 किमीकरिता 15 रुपये, 4 ते 6 किमीकरिता 20 रुपये, 6 ते 8 किमीकरिता 25 रुपये, 8 ते 10 किमीकरिता 30 रुपये आणि 10 किमीपुढील अंतराकरिता 40 रुपये तिकीट दर आहेत.
पहिली आणि शेवटची मेट्रो कधी धावणार? First And Last Metro Timing
तळोजा-पेंधर वरून सुटणारी मेट्रो बेलापूर रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. मेट्रोने येणाऱ्या प्रवाशांना बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून हार्बर मार्गे मुंबई , ठाणे येथे जाणे सोईस्कर होणार आहे. उद्या, शुक्रवार 17 नोव्हेंबरपासून दुपारी 3 वाजता मेट्रो सुरू होणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असणार.
तर, शनिवारी, 18 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. मेट्रो 10 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे.
नवी मुंबई मेट्रोची वैशिष्ट्ये काय?
अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.