Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर C-295 या विमानाचे यशस्वी लॅडिंग झाले असून अग्निशमन दलाने या यशस्वी चाचणीनंतर मानवंदना देण्यात आली.
नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाच्या नव्या कोऱ्या धावपट्टीवर शुक्रवारी दुपारी पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय वायुदलाच्या सी 295 या प्रकाराच्या विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आले. विमान धावपट्टीवर (Navi Mumbai Airport) उतरल्यानंतर त्याला वॉटर सॅल्युटद्वारे मानवंदना देण्यात आली.
नवी मुंबई विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही या धावपट्टीपासून काही अंतरावर उड्डाण करत फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. C295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आलं होते. C-295 या विमानाचे यशस्वी लँडिंग झाल्यामुळे आता लवकरच नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प रखडला आहे. मात्र, आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्यांचे काम पूर्ण झाले आहे. मे 2025 पर्यंत नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाची घोषणा झाल्यापासूनच या पट्ट्यातील जमिनी आणि घरांचे दर वधारले होते. या भागात गेल्या काही वर्षांमध्ये कनेक्टिव्हिटीच्यादृष्टीने अनेक पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी झाली होती. अटल सेतू (Atal Setu), मेट्रो आणि रस्ते मार्गामुळे नवी मुंबई विमानतळाला उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ हे राज्यातील सर्वात मोठे विमानतळ आहे. या विमानतळाच्या बाजूला जेएनपीटी बंदर (JNPT Port) आहे. परदेशात पाठवला जाणारा आंबा आणि शेतमालाच्या निर्यातीला नवी मुंबई विमानतळामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना हे विमानतळ प्रत्यक्षात कधी सुरु होणार, याची उत्सुकता आता नव्याने लागली आहे.
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये
* नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात मोठे विमानतळ
* पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन्ही सुविधा
* मुंबई विमानतळाचा ७० टक्के लोड कमी होणार
* वर्षाला ९ कोटी प्रवाशी उपयोग करणार
* ३० ते ३५ हजार करोड रूपये खर्च, ४ हजार एकर क्षेत्रात विमानतळ तयार होणार
* दोन रन वे आणि चार टर्मिनल असणार. प्रत्येक टर्मिनल इंटरनली मेट्रोने जोडणार
* मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर मेट्रोने जाता येणार
नवी मुंबई विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं फोटोसेशन
भारतीय वायूदलाचे सी 295 हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वैमानिकांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी विमानात बसून फोटोसेशन केले. एकनाथ शिंदे यांनी विमानाच्या खिडकीत बसून बाहेर हात उंचावत ऐटीत एक फोटोही काढला. हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा