Automatic Weather Station : नवी मुंबईत बसवले जाणार स्वयंचलित हवामान केंद्र, खारघर दुर्घटनेनंतर हालचाली
Automatic Weather Station : नवी मुंबईतील परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय हवामान विभागाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
Automatic Weather Station : नवी मुंबईतील (Navi Mumbai) परिसरात स्वयंचलित हवामान केंद्र (Automatic Weather Station) बसवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय हवामान विभागाकडून (IMD) हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यादरम्यान खारघरमध्ये (Kharghar) झालेल्या दुर्घटनेनंतर यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यानंतर केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून जागेची पाहणी करत तातडीने स्वयंचलित हवामान केंद्राची जागा निश्चित करण्याचे आदेश मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिकांना देण्यात आले आहेत.
पावसाळ्याआघी जागा ठरवून स्वयंचलित हवमान केंद्र बसवण्याचे प्रयत्न
स्वयंचलित हवामान केंद्र बसवल्यानंतर परिसरातील कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग याची माहिती मिळणार आहे. पावसाळ्याच्या आधीच लवकरात लवकर जागा ठरवत स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यासाठी भारतीय हवामान विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जागेच्या पाहणीकरता लवकरच परिसराचे निरीक्षण केले जाणार आहे.
नवी मुंबईत हवामान विभागाचे केंद्र नसल्याने तापमानाचा आकडा सांगण्यास अडचण
भारतीय हवामान विभागाचे एकही केंद्र नवी मुंबई परिसरात नसल्याने तातडीची पावलं जात आहेत. खारघरमधील दुर्घटनेच्या वेळी त्या जागेवरील तापमान 41 अंश किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचं निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं होतं. मात्र, भारतीय हवामान विभागाचे केंद्र घटनास्थळाच्या परिसरात नसल्याने निश्चित तापमानाचा आकडा सांगण्यात अडचण निर्माण झाली.
रबाळेतील तापमानावरुन खारघर दुर्घटनेच्या दिवसाच्या तापमानाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाचे एक स्टेशन रबाळे परिसरात आहे, जिथे दुर्घटनेच्या दिवशी 38.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. त्याआधारेच खारघर परिसरातील तापमान आणि महापालिकेच्या नोंदीनुसार तापमान 41 अंश सेल्सिअसच्या जवळपास असल्याची नोंद करण्यात आली.
VIDEO : Kharghar Automatic weather station : खारघर परिसरात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र