कोरोना काळात रुग्णांना गरज असताना नाशिक मनपा हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळखात पडून
नाशिक महापालिकेने मोठा गाजावाजा करत दीड महिन्यापूर्वी कोविडसाठी हजार बेडची क्षमता असणणारे हॉस्पिटल खुलं केल. मात्र अद्याप केवळ 500 बेड्स उपलब्ध आहेत.
नाशिक : नाशिक शहरात एकीकडे रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर मिळत नाही आणि दुसरीकडे महापालिकेच्या हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत. नागरिकच काय पण इथली आरोग्य व्यवस्थाच विना ऑक्सिजनच्या व्हेंटिलेटरवर शेवटचे श्वास घेतेय की काय अशी विदारक स्थिती उद्भवली आहे.
नाशिक महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये सुसज्ज वॉर्ड आहे. इथे एक दोन नव्हे तर तब्बल 15 व्हेंटिलेटर ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत आहेत. या व्हेंटिलेटरने आजवर शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणे अपेक्षित होते. मात्र लोकांना जीवदान देणारी ही व्हेंटिलेटर्स तसेच पडून आहेत. विशेष म्हणजे कोरोनाशी लढण्यासाठी पीएम केअर फंडमधून ही व्हेंटिलेटर महापालिकेला मिळाली आहेत. एकूण 15 व्हेंटिलेटर्स पैकी मनपाने 2 व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयाल देऊन टाकलीत. उर्वरित इथे पडून आहे. व्हेंटिलेटरमध्ये ऑक्सिजनवाटे प्रेशर येत नाही. त्यातही 23 केएल ची टाकी बसवावी लागणार असल्यान अजून काही दिवस ह्या व्हेंटिलेटरचा वापर करता येणार नाही.
नाशिक महापालिकेने मोठा गाजावाजा करत दीड महिन्यापूर्वी कोविडसाठी हजार बेडची क्षमता असणणारे हॉस्पिटल खुलं केल. मात्र अद्याप केवळ 500 बेड्स उपलब्ध आहेत. 42 व्हेंटिलेटरची व्यवस्था इथे होणार होती. मात्र अद्याप एकही सुरू नाहीये. इथे उपचार घेणाऱ्या रुग्णाला ज्यावेळी व्हेंटिलेटरची गरज लागते तेव्हा त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागते. यात रुग्ण दगवण्याची शक्यताही असते.
नाशिक शहरात आतापर्यंत 509 रुग्णांचे प्राण गेलेत. त्यातील अनेकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. खाजगी हॉस्पिटलकडून आर्थिक लूट होते म्हणून रुग्ण मनपच्या हॉस्पिटलकडे वळतात. मात्र मनपाचे हॉस्पिटल रुग्णांचे प्राण वाचवण्यात सक्षम नसल्याचेच समोर येतंय. कोरोनाच्या या काळात मनपाची आरोग्य व्यवस्था युद्धपातळीवर काम करणार नसेल तर आशा आरोग्य व्यवस्थेचा उपयोग काय हा सवाल उपस्थित होतोय.