व्हायरल लग्नपत्रिकेला सोशल मीडियात 'लव्ह जिहाद'चा रंग; लग्नच रद्द केल्याची दुर्दैवी घटना
नाशिकमधील एका लग्नपत्रिकेची सध्या महाराष्ट्रभर सोशल मीडियात चर्चा आहे. निंदनीय बाब म्हणजे या सर्व प्रकरणाला 'लव्ह जिहाद'चा रंग देण्यात आल्याने हे लग्नच रद्द झाले आहे.
नाशिक : नाशिकमधील एका लग्नपत्रिकेला सोशल मीडियातून लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने वधू आणि वर कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला. शेवटी समाजाचा हा मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी हे लग्नच रद्द केल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
शहरातील मधील एका हिंदू कुटुंबातील तरुणीचे काही महिन्यांपूर्वी मुस्लिम समाजाच्या एका मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संबंधित तरुणी ही दिव्यांग असल्याने तिचे वडील चिंतेत होते मात्र मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-ईच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने ते देखील खूश होते. दोन्ही कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे हे लग्न हिंदू पद्धतीने करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
बैठक यशस्वी झाल्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता हे लग्न धुमधडाक्यात साजरे न करता मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै 2021 रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. तारीख तसेच विवाहस्थळही निश्चित होताच वधू आणि वर पक्षाची मंडळी चांगलीच कामाला लागली. घरात रेलचेल सुरु झाली. बस्ता कसा खरेदी करायचा, जेवणासाठी मेनू काय काय निश्चित करायचे याची चर्चा देखील सुरु झाली. विशेष म्हणजे लग्नाची पत्रिका तयार होऊन पत्रिका वाटपाचाही कार्यक्रम सुरु झाला. मोजक्या मंडळींना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली पत्रिका मुला-मुलीच्या कुटुंबावर मोठं संकट देऊन गेली आणि त्यांच्या आनंदावरच विरजन पडले.
ही लग्नपत्रिका काही कट्टरवादी संघटनांच्या डोळ्यात खुपली आणि त्यांनी हे लग्न म्हणजे 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा ठपका ठेवला. लव्ह जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्स ऍप तसेच फेसबुकच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाली. व्हॉट्स ऍपवर संबंधित पत्रिका आणि लव्ह जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधू आणि वर दोन्ही मंडळींना प्रचंड मनस्ताप झाला. वारंवार येणारे फोन कॉल्स, मेसेजेस यामुळे हे कुटुंबीय हैराण झाले आणि अखेर या सर्व त्रासाला कंटाळून मुलीच्या वडिलांनी आपल्या समाजाच्या अध्यक्षांना एक पत्र लिहीत आम्ही हा विवाह सोहळा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. या मुला-मुलींनी आधीच कोर्ट मॅरेज केल्याची देखील नाशिकमध्ये चर्चा आहे मात्र संबंधित तरुणी ज्या समाजाशी संबंधित आहे त्या समाजाच्या अध्यक्षांनी असे कुठलेही कोर्ट मॅरेज झालं नसल्याचं एबीपी माझाशी बोलतांना स्पष्ट केलय. विशेष म्हणजे आमच्यावर कुठल्याही संघटनांचा दबाव नव्हता किंवा धमक्याही आम्हाला दिल्या गेल्या नाहीत हे देखील त्यांनी बोलून दाखवलय.
सध्या संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंबीय प्रचंड तणावात असून मुलीच्या वडिलांवर काय वेळ आली असेल याची कल्पनाच करवत नाही. चुकीच्या पद्धतीने पत्रिका व्हायरल करत बदनामी केल्याप्रकरणी अद्यापपावेतो पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचे नाव कोणी दिले? हे लग्न रद्द करण्यामागे मुलीच्या घरच्यांवर खरंच कोणाचा दबाव तर नव्हता ना? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतायत.
महत्वाच्या बातम्या :