Nashik Acb Trap : नाशिक पोलिसांना झालंय तरी काय? पुन्हा दोन पोलीस 'एसीबी'च्या जाळ्यात
Nashik Acb trap : २० हजारांची लाच स्वीकारताना नाशिकमधील दोन पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस दल चर्चेत आले आहे.
Nashik Acb trap : नाशिक पोलिसांना झालंय तरी काय? असा यक्ष प्रश्न विचारण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. येथील एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह पोलीस नाईकाने लाच स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकीकडे नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. त्याच नव्याने आलेल्या पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी थोपवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे निर्भयासह इतर पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. असे असताना सलग दोन दिवसांत दोन एसीबीच्या कारवाया झाल्याने नाशिक पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नाशिक शहरातील महत्वाचे समजले जाणारे भद्रकाली पोलीस स्टेशन. या ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस नाईकास लाच स्वीकारताना पकडले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक बैरागी असे अटक केलेल्यांचे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. या घटनेनंतर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण उघड होताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अॅक्शन मोडवर येत वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांची बदली करण्यात आली आहे.
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार यांनी तक्रारदार यांच्याविरोधात दाखल असलेल्या 376 सह इतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तसेच कोर्टात चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी 13 मे 2022 रोजी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपतप्रतिबंधक विभागाला याबाबतची तक्रार केली. दरम्यान, आज दि. 18 मे रोजी लाचेची रक्कम देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
विशेष म्हणजे कालच आडगाव पोलिस ठाण्यात 20 हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसांत दोन कारवाया झाल्याने पोलिस विभागात एकाच खळबळ उडाली. या लाच प्रकरणाला एक दिवस होत नाही तोच भद्रकाली पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलीस नाईक तुषार बैरागी हा दोघे एका प्रकरणात 20 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.
नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी पोलीस दल डोळ्यात तेल घालून ड्युटी करत असताना अशाप्रकारे पोलीस दलातील अधिकारी, नाईक लाच घेत असल्याने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर राज्याचा गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' उंचावण्यासाठी उपक्रम राबवत असताना अशाप्रकारे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.