Dada Bhuse : वंदे भारत एक्स्प्रेस मनमाडला थांबावी, दादा भुसेंची रावसाहेब दानवेंकडे मागणी
Dada Bhuse : वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) मनमाड जंक्शनला ( Manmad Junction) थांबा देण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
Dada Bhuse : वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) मनमाड जंक्शनला ( Manmad Junction) थांबा देण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली आहे. मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (Mumbai to shirdi vande Bharat Express) कालपासून (10 फेब्रुवारी 2023) सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर सायंकाळी नाशिकरोड स्थानकावर ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात या एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भाजप आमदार आणि रेल परिषदेचे सदस्य उपस्थिती होते.
शिर्डीला जाण्यास इच्छुक असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना लाभ होणार
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस कालपासून सुरु झाली आहे. ही एक्स्प्रेस मनमाड जंक्शनला थांबावी अशी मागणी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. ही ट्रेन सुरू झाल्याचा आनंद नक्कीच आहे. मात्र, मनमाड जंक्शनला ट्रेनसाठी थांबा दिल्यास शिर्डीला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना याचा चांगला फायदा होणार असल्याचे दादा भुसे म्हणाले. याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवल्याचेही दादा भुसे म्हणाले.
मुंबई ते शिर्डी वेळापत्रक
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी 6.20 वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे 5 तास 20 मिनिटांनी सकाळी 11.10 वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दादर, ठाणे, नाशिक रोड स्थानकावर थांबेल. तर साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस साईनगर शिर्डी येथून सायंकाळी 5.25 वाजता सुटेल आणि 5 तास 25 मिनिटांनी ती मुंबईत रात्री 10.50 वाजता पोहोचेल. मंगळवारी मुंबई आणि शिर्डी येथून ही गाडी नसेल.
काय असणार तिकीट दर?
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये मोजावे लागणार आहेत. या तिकिटामध्ये केटरिंगचा देखील समावेश आहे. प्रवाशांनी ऑन-बोर्ड केटरिंगची निवड न केल्यास चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसीटसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये तिकीट असेल.
साईनगर शिर्डी येथून साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे अनुक्रमे 1130 रुपये आणि चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचसाठी 2020 रुपये असेल. यामध्ये केटरिंग शुल्काचाही समावेश आहे. कॅटरिंगशिवाय चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कोचचे भाडे अनुक्रमे 840 आणि 1670 रुपये असेल.
महत्त्वाच्या बातम्या: