(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : दिंडोरीची जागा पवार गटाला, नाशिकची ठाकरे गटाला, शरद पवारांची घोषणा
Lok Sabha Elections 2024 : नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढविणार आहे. तसेच दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.
Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच पुन्हा उमदेवार असतील, असे घोषणा काल खासदार श्रीकांत शिंदेंनी केली. या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाशिक लोकसभेबाबत मोठी घोषणा केली आहे.
नाशिक लोकसभेची जागा महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गट लढविणार आहे. तसेच दिंडोरी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल
शरद पवार म्हणाले की, लोकांचा कल आमच्या आघाडीला अनुकूल आहे, शेतकऱ्यांची सत्ताधारी लोकांवर नाराजी आहे. धुळे,नाशिक, सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहेत. ऊस महत्वाचे पीक आहे, इथेनॉल आणि इतर तयार होतात, केंद्राचे धरसोड वृत्ती आहे, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. शेतकरी अस्वस्थ आहेत तर बेरोजगारी महागाईमुळे सर्वसामान्य अस्वस्थ आहेत. यांची किंमत सत्ताधारी पक्षाला बसेल. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही.
नाशकात हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर?
नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असेल, असे शरद पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि ठाकरे गटाकडून विजय करंजकर (Vijay Karanjkar) अशी लढत होण्याची शक्यता आहे.
दिंडोरीतून भारती पवारांसमोर भास्कर भगरेंचे आव्हान?
तर दिंडोरीच्या जागेसाठी माजी जि. प. सदस्य भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांच्या समोर भास्कर भगरे यांचे आव्हान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज भारती पवार यांच्या मतदारसंघातील निफाड तालुक्यात शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेत शरद पवार भास्कर भगरेंच्या नावाची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी! नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा
Vijay Shivtare On Ajit Pawar : देवाची शपथ घेऊन सांगतो, अजित पवार..., विजय शिवतारे काय काय म्हणाले?