मोठी बातमी! नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा
Shrikant Shinde : शिवसेनेच्या वतीने नाशिकला कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली आहे.
![मोठी बातमी! नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा Shrikant Shinde announced the name of Hemant Godse for Nashik Lok Sabha Constituency Lok Sabha Elections 2024 Nashik News BJP NCP Shiv Sena Mahayuti Seat Sharing Maharashtra Politics Marathi News मोठी बातमी! नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/12/ac10770ca296b0d7bb9a86f4beebb5621710256320357923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Elections 2024 : आज मंगळवारी (दि. 12) शिवसेनेच्या वतीने नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली आहे.
नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचे आहे, दुसरे कोणाचे नाव नसल्याचे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहे आणि त्यात गोडसे पण असतील, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?
नाशिकमधून शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसेचे तिकीट कट होणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता श्रीकांत शिंदेंनी एकप्रकारे हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्याने आता भाजप आणि राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार - श्रीकांत शिंदे
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, या मेळाव्याला चार वाजेपासून लोक आले आहेत. मला यायला उशीर झालाय. हेमंत आप्पा तुमचा धनुष्यबाणच नाशिकला राहणार आहे. हेमंत गोडसेंना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवायचे आहे. आपले काम बघून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. गद्दार, खोके म्हणतात पण वेळ होती तेव्हा तुम्ही घरी बसून राहिलात. कोणता मुख्यमंत्री इर्शाळवाडीत डोंगर चढून जातो ते अजूनही स्वतःला कार्यकर्ता समजतात.
अब की बार 400 पार, महाराष्ट्रात 45 पार
बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्या मंदिर, 370 कायदा, सीएए कायदा हे सगळे मोदींनी पूर्ण केले आणि त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत. अब की बार 400 पार आणि महाराष्ट्रात 45 पार महायुतीचे खासदार पाठवायचे आणि त्यात हेमंत गोडसेंनाही पाठवायचे आहे. फक्त गोडसेंनी काम करायचे, असे नाही आपण सगळ्यांनी काम करायचे आहे, घराघरापर्यंत आपले काम पोहोचवायचे आहे, असे श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.
कोण आहेत हेमंत गोडसे ?
हेमंत गोडसे हे सध्या शिवसेना शिंदे गटात असून ते नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. २००७ ते २०१२ या काळात नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवित त्यांनी शहराच्या राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी 'मनसे'तर्फे प्रथमच खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 सालच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे हे पहिल्यांदा नाशिकचे खासदार झाले. तर 2019 साली खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यातच सरळ लढत झाली. यावेळी हेमंत गोडसे हे पुन्हा निवडून आले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)