Salim Kutta : सलीम कुट्टासोबत पार्टीचा आरोप; पोलिसांकडून अडीच तास कसून चौकशी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,
Salim Kutta : आज सलग दुसऱ्या दिवशी तब्बल अडीच तास बडगुजर यांची चौकशी करण्यात आली. तसेच बडगुजर यांची चौकशी करण्याआधी व्हायरल व्हिडिओतील 3 जणांची देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः चौकशी केली

Salim Kutta : शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची आज सलग दुसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Nashik Police Crime Branch) चौकशी केली असून रविवारी आणि सोमवारी ही चौकशी केली जाणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी विधिमंडळ अधिवेशनात सुधाकर बडगुजर यांचे बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुट्टा (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी करतानाचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने सुधाकर बडगुजर आणि व्हिडिओत दिसणाऱ्या संबंधित व्यक्तींशी चौकशी करण्यास सुरुवात केली.
आज सलग दुसऱ्या दिवशी तब्बल अडीच तास बडगुजर यांची चौकशी करण्यात आली. तसेच बडगुजर यांची चौकशी करण्याआधी व्हायरल व्हिडिओतील 3 जणांची देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः चौकशी केली. पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग असे या तिघांचे नाव आहे. त्यानंतर आज संध्याकाळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी बडगुजर यांची चौकशी केली.
चौकशीनंतर बडगुजर यांनी काय म्हटले?
चौकशीत पोलिसांनी प्रश्नावली तयार केली असून, त्यानुसार उत्तरे दिलीय, अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली. पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली रविवारी आणि सोमवारीदेखील चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. व्हिडिओच्या अनुषंगाने बडगुजर यांना प्रश्न विचारले जात असून, त्यांची आज चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
व्हिडीओत दिसणाऱ्यांची चौकशी होणार
या व्हिडिओतील चेहऱ्यांची ओळख पटवणे सुरू असून, व्हिडिओतील सर्व लोकांना चौकशीसाठी बोलवले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात आतापर्यंत चार-पाच लोकांना चौकशी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पार्टी झाली, ते फार्म हाऊस कुणाचे, पार्टीचे नियोजन कोणी केले होते. सलीम कुट्टा याला कोणी बोलावले. व्हिडीओ शूटिंग कोणी केले, पार्टी का आणि कधी बोलावण्यात आली होती याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सलीम कुट्टाप्रकरणी चौकशीत अनेकजण सापडणार; दादा भुसे यांचा ठाकरे गटाला इशारा
सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, बडगुजर हा छोटा मासा आहे, बात निकली है तो बहोत दूर तक जायेगी असं म्हणत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे. ललित पाटील ड्रॅग्स प्रकरणात अणु रेणू इतकाही संबंध आल्यास पद आणि राजकारण दोन्हीही सोडून देईल असंही ते म्हणाले.
मुंबई बॉम्ब स्फोटाचा सूत्रधार सलीम कुट्टा या देशद्रोह्यासोबत नाशिक शिवसेना ऊबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी बडगुजर फॉर्मवर पार्टी दिल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. तिथे नाचगाणे देखील झाल्याचं दिसून आलं. यामध्ये काही क्रिमिनल देखील सहभागी होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सुधाकर बडगुजरांना सगळ्या गोष्टींची आठवण होईल. बडगुजर यांच्या चौकशीची मागणी आ.नितेश राणे यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
