Salim Kutta : नितेश राणेंच्या आरोपानंतर चर्चेत आलेला बाँबस्फोटातील आरोपी सलीम कुट्टा कोण आहे? तो दाऊदला कसा भेटला?
Who is Salim Kutta : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुट्टा याच्यासोबतचा एक व्हिडीओ दाखवला. त्यानंतर सलीम कुट्टा नेमका कोण आहे याची चर्चा सुरू झाली.
मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षाचे सुधाकर बडगुजरांचा सलीम कुट्टा (Salim Kutta) याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ दाखवला आणि एकच चर्चा सुरू झाली. सलीम कुट्टा उर्फ मोहम्मद सलीम मीरा शेख, ज्याला 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुट्टा हा सध्या पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृहातील सूत्रांनी सांगितले की, सलीमला 2016 मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्याला पॅरोलवर पाठवण्यात आले नाही. यापूर्वी तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात होता. त्यावेळी तो पॅरोलवर गेला असावा. सलीमच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असावा. 2016 च्या अगोदर तो बाहेर आला होता, तेव्हाचा व्हिडीओ असावा. गेल्या काही वर्षांत तो कधीच पॅरोलवर आला नव्हता.
कोण आहे सलीम कुट्टा? (Who is Salim Kutta)
मोहम्मद सलीम मीरा शेख हा मूळचा तामिळनाडूच्या कुट्टा, जिल्हा तंजावर या गावचा आहे. तो मुंबईत जन्मला आणि वाढला. त्याने बॉम्बे येथील सेंट इग्नेशियस स्कूलमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने शाळा सोडली. पायधोनी, पलटन रोड, भायखळा आणि कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याचे दाऊद इब्राहिमच्या टोळीतील सदस्यांशी भांडण झाले होते.
त्याने खटल्याच्या सुनावणीदरम्यान नियुक्त टाडा न्यायालयाला कुट्टा म्हणजे हिंदीत कुत्रा असा अर्थ होत असल्याने न्यायालयाच्या नोंदीतून तो शब्द वगळण्याची विनंती केली होती. प्रतिस्पर्ध्यांबद्दल त्याच्या निर्दयी दृष्टिकोनामुळे त्याला अंडरवर्ल्ड वर्तुळात "सलीम कुट्टा" म्हणून ओळखले जात असे. कारण तो त्यांच्यावर एखाद्या शिकारी कुत्र्यासारखा हल्ला करत असे.
दहशतवादी मोहम्मद डोसासाठी काम
1993 सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी मोहम्मद डोसासाठी काम करणाऱ्या मॉड्यूलचे नेतृत्व सलीम करत होता. तो गुजरातमध्ये शस्त्रास्त्रे उतरवण्यात सहभागी झाला होता. सलीम आणि त्याच्या साथीदारांनी शस्त्रे आणि आरडीएक्स गोळा करून सहआरोपींना वाटले होते. 1993 च्या बॉम्बस्फोटात या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघे आणि शेखाडी किनार्यावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचे आणखी दोन लँडिंग झाले होते, जे आणखी एक फरार आरोपी टायगर मेमनने केले होते. 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांच्या कटात भाग घेतल्याबद्दल आणि स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा वाटप केल्याबद्दल ट्रायल कोर्टाने सलीमला दोषी ठरवले होते.
सलीम अंडरवर्ल्डमध्ये कसा सामील झाला?
सन 1990 मध्ये त्याची आई आजारी पडली होती आणि तिला चर्नी रोड येथील सैफी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सलीमला पैशांची नितांत गरज होती. पोलीसही त्यांच्या मागे लागले होते, त्यामुळे रुग्णालयात त्याच्या आईला भेट घेणे हि अवघड होते. त्या काळात तो नखुदा मोहल्ला येथील मुस्तफा डोसा उर्फ मुस्तफा मजनूच्या कार्यालयात, त्याचा मित्र अबू बकर, जो मुस्तफा मजनू (डोसा भाऊ) सोबत काम करत होता, त्याला भेटण्यासाठी गेला होता.
त्या वेळी तो मुस्तफा डोसा उर्फ मुस्तफा मजनूने सलीमच्या अडचणींबद्दल चौकशी केली. त्याने मुस्तफाला सांगितले की, तो काही गुन्हेगारी प्रकरणात सामील आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुस्तफाने त्याला त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगितले आणि त्याच्या आईच्या उपचारासाठी त्याला 5000 रुपये दिले. तसेच त्याच्या गुन्हेगारी खटल्यांवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले.
अटक आणि जामीनावर सुटका
सलीमने 5000 रुपये स्वीकारले, डोसांच्या टोळीत सामील झाला. त्यानंतर डोसाने सलीमला पोलिसांसमोर हजर केले आणि त्याची जामिनावर सुटका केली. या सर्व दयाळू कृत्यांमुळे तो डोसा बंधूंशी इतका एकनिष्ठ झाला की अल्पावधीतच तो मोहम्मद डोसाचा अंगरक्षक बनला. डोसा बंधूंना सोने पोहोचवण्याचे काम तो करत होता.
टायगर मेमन यापूर्वी 1989 पर्यंत डोसा बंधूंसोबत काम करत होता. तेव्हापासून त्याने तस्करीचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आणि त्यामुळे सलीम डोसा टोळीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि डोसा भावाने त्याला फिरोज अब्दुल रशीद खान आणि मेकॅनिक चाचा यांच्यासह 5 टक्क्यांच्या तस्करीच्या कामात भागीदार बनवले.
रायगड, रत्नागिरी आणि मंगळुरू येथेही त्यांनी अनेक लँडिंगमध्ये भाग घेतला होता. डोसा टोळीतील लँडिंग एजंट आणि ग्राहकांची माहिती त्याने दिली तपास आधिकारींना दिली होती.
सलीम दाऊद इब्राहिमला कसा भेटला?
दंगलीच्या काळात सलीमला गोळ्या घालण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे तो काही दिवस फिरोजच्या घरात लपून बसला होता. मोहम्मद डोसाच्या सूचनेनुसार जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी 1993 च्या सुरुवातीला तो दुबईला गेला. सलीम, फिरोज, कय्युम सजनी, युसूफ बाटला, शोएब बाबा, सय्यद कुरेशी आणि अहमद लांबू हे दुबईला गेलेल्या विमान तिकिटांचा सर्व खर्च मोहम्मद डोसाने केला.
जेव्हा ते दुबई विमानतळावर पोहोचले तेव्हा मोहम्मद डोसा आणि मुस्तफा मजनू यांनी विमानतळावर सलीमचे स्वागत केले. त्याला दीरा टॉवरमधील मुस्तफा मजनूच्या कार्यालयात नेण्यात आले जेथे ते 15 दिवस राहिले.
एके दिवशी मुस्तफा मजनू सलीमला दुबई येथील दाऊद इब्राहिमच्या घरी घेऊन गेला. व्हाइट हाऊस जे दुबईच्या झुमेरा भागात होते, त्या ठिकाणी घराच्या हॉलमध्ये नेण्यात आले. घरात अनेक लोक होते. ते दाऊद इब्राहिमशी गटागटाने बोलत होते. त्याने छोटा शकील, सलीम तलवार एजाज पठाण, हाजी अहमद आणि मुन्ना अब्दुल्ला यांना तिथे पाहिले. सलीम सध्या येरवडा कारागृहात आपली शिक्षा भोगत आहे.
ही बातमी वाचा: