(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wine: सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा फायदा शेतकरी आणि उत्पादकांना होणार; वाईन उत्पादक संघटनेचं मत
Nashik Wine: राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयामुळे या क्षेत्राला चालना मिळणार असल्याचं आखिर भारतीय वाईन उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे.
नाशिक: राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलंच तापलंय. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे हित बघता हा निर्णय घेतला गेल्याचं सरकारकडून सांगण्यात येतय. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा शेतकरी आणि वाईन उत्पादकांना नक्कीच होणार असल्याचं अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेने सांगितलं आहे.
सुपर मार्केटमध्ये देखील वाईन मिळणार या निर्णयामुळे सध्या नाशिकच्या वाईन उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. कारण नाशिकचे वातावरण हे वाईन उद्योगासाठी पोषक असून देशातील संपूर्ण वाईन निर्मितीच्या 60 टक्क्याहून अधिक वाईन ही एकट्या नाशकात तयार होते. त्यामुळेच नाशिकची ओळख ही वाईन कॅपिटल म्हणून तयार झालीय.
महाराष्ट्राचा विचार केला तर लहान मोठ्या एकूण 72 वाईनरीज असून त्यातून वर्षभरात सुमारे दोन कोटी लिटर वाईन निर्मिती केली जाते. द्राक्षांच्या वाईनला सर्वाधिक मागणी असून जवळपास पाच हजार एकरवर द्राक्ष लागवड केली जाते. द्राक्षांसोबतच जांभूळ, डाळिंब, खजूर, मध, स्ट्रॉबेरी, स्टार फ्रूट, मॅंगो, चिकू, संत्रा, मोसंबी, केळी यापासूनही वाईन तयार केली जाते. वर्षभरात राज्यात 80 लाख लिटर वाईनची विक्री होते तर अमेरिका, इंग्लंडसह 25 वेगवेगळ्या देशात एक कोटी लिटरपेक्षा जास्त वाईनची निर्यात होते. या व्यवसायातून वर्षाला पाचशे कोटींची उलाढाल होते.
एक्साईज ड्यूटी आणि 20 टक्के व्हॅट मिळून साधरणपमे 45 कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा होतो. एकीकडे अशी परिस्थिती असली तरी मात्र गेल्या 20 वर्षात शासनाने वाईन उत्पादकांना मदत केली. पण मार्केटिंगच्या उद्देशाने काही सहाय्य पुरवले नव्हते. त्यामुळे आताच्या या निर्णयाचा नक्कीच वाईन उत्पादकांना फायदा होणार असल्याचं अखिल भारतीय वाईन उत्पादक संघटनेकडून सांगण्यात येतय. मात्र सरकारच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. सध्या हा चर्चेचा विषय ठरलाय.
राज्यातील वाईन उद्योगाला चालना मिळाल्यास त्याचा फायदा हा ग्रामीण विकास, कृषी पर्यटन, रोजगार निर्मिती यांसह हॉटेल व्यवसायाला देखील होईल असं मतही व्यक्त केलं जात आहे.
संबंधित बातम्या :
- अजितदादा म्हणाले, 'दारू आणि वाईनमध्ये जमीन आसमानाचा फरक' तर पडळकर म्हणतात 'टक्केवारीसाठी संशोधन'
- Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर म्हणतात, 'संजय राऊत बावचळलेत, पवारांनी आयुष्यात खूप सोसलंय, म्हणून ते...'
- Wine: 'वाईनला लिकर म्हणत भुई बडवताहेत' म्हणत वाईन उत्पादक संघटनेचा निर्णयाला पाठिंबा, या मागण्याही केल्या...