Sushma Andhare : 'सुषमा अंधारे यांचे आरोप तथ्यहीन, माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न', नाशिकच्या अमन परदेशी यांचे स्पष्टीकरण
Nashik News : सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात केलेले आरोप तथ्यहीन असून माझे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपात तथ्य नाही. मी अंधारे यांच्याशी कधीही बोललो अथवा संपर्क केलेला नाही, अंधारे यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून माझे नाव खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तथ्यहीन आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा नाशिकच्या अमन परदेशी यांनी दिला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या अमन परदेशी नावाच्या व्यक्तीने ड्रग्स प्रकरणी मंत्र्यांकडून फोन करून मांडवली करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत मालेगावातील अमन परदेशी याने हे आरोप फेटाळून लावले आहे. 'मी अंधारे यांच्याशी कधीही बोललो अथवा संपर्क केलेला नाही, अंधारे यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून माझे नाव खराब करण्याचा त्यांनी प्रयत्न केला असल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सुषमा अंधारे यांचे आरोप तथ्यहीन असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे देखील परदेशी यांनी म्हटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare Live) यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava live) टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दादा भुसे (dada Bhuse) यांच्यावर कडाडल्या. त्यांनी नाशिक ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारला घेरले. यावेळी त्या म्हणाल्या की, दहा दिवसांपासून नोटीस पाठवणारे मला अंधारात ठेवून सेटलमेंटची भाषा करत आहेत. नाशिकचा अमन परदेशी पुण्याच्या एकीला फोन करतो. दबाव आणून घाबरवले जात आहे, अब्रुनुकसानीचा दावा टाकायची भाषा करत आहेत. मात्र ज्यांना महाराष्ट्राच्या अब्रुची जाण नाही, ते मला नोटीस पाठवणार का? मला नाही अब्रु अन् मी कशाला घाबरु, अशी गावाकडे म्हण आहे. यांचेही असेच काम आहे, असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हणत अमन परदेशी यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांचे अमन परदेशी यांनी खंडन केले आहे.
पालकमंत्री गोट्या खेळत होता का?
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांच्यावर कडाडून प्रहार केला. नाशिकमध्ये ललित पाटील ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी चौफेर हल्ला चढवला आहे. दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून प्रहार केला. नाशिकमध्ये कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज सापडत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळत होता का? अशा शब्दात त्यांनी दादा भुसेंवर प्रहार केला. महाराष्ट्र ड्रजमुक्त झाला पाहिजे, महाराष्ट्र नशामुक्त झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या.