
Nashik Staff Strike : संपामुळे आजीबाईचं ऑपरेशन झालं नाही, डॉक्टर म्हणे संप मिटल्यावर या, नाशिकमध्ये रुग्णांचे हाल
Nashik Staff Strike : संपामुळे 248 किलोमीटरचं अंतर कापून नाशिकला उपचारासाठी आलेल्या जोडप्याला माघारी फिरावे लागले.

Nashik Staff Strike : जुन्या पेन्शनच्या (Old Pension) मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप (Staff strike) तर पुकारला आहे. मात्र या संपामुळे रुग्णाचे मोठे हाल होत असल्याचं चित्र राज्यभर बघायला मिळते आहे. नाशिकमध्ये (Nashik) तर पाच तासांचा प्रवास करुन डोळ्यांवर उपचारासाठी आलेल्या आजीबाईचा ऑपरेशन तर झालेच नाही, मात्र डॉक्टरांनी अजब सल्ला दिल्याचे सोबत आलेल्या आजोबांनी सांगितले.
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाचा (Staff Strike) परिणाम राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशातच जालना जिल्ह्यात राहणाऱ्या आजोबांनी 248 किलोमीटरचं अंतर कापून नाशिक गाठलं. मात्र संपामुळे सेवा बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. या संपामुळे अनेक नागरिकांना परत माघारी फिरावे लागले. यात अनेकजण हिंगोली, जालना, जळगाव आदी परिसरात नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
'टीव्हीवर संप मिटतो ते बघा आणि या'
जालन्यामध्ये (Jalna) राहणाऱ्या अरुणाबाई शंकर वाघ या आजींच्या उजव्या डोळ्यावर मोतीबिंदू आला आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात चांगले उपचार होतात असे नातेवाईकांनी सांगितल्याने अरुणाबाई आणि त्यांचे पती शंकर वाघ पंधरा दिवसांपूर्वी नाशिकला आले होते, रक्तातील साखर कमी होण्याच्या गोळ्या देऊन पंधरा दिवसांनी या आपण शस्त्रक्रिया करु असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. औरंगाबादला मुलाच्या घरी राहणारे हे आजी आजोबा काल रात्री बारा वाजता परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसले आणि पहाटे पाच वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. नाशिक जि ल्हा रुग्णालयात पोहोचताच रुग्णालयातच आयसीयूबाहेर ते झोपी गेले. साडेसात वाजता ओपीडीबाहेर ते येऊन बसले, नऊ वाजता ओपीडीचे दरवाजे उघडताच आजी आजोबा डॉक्टरांना जाऊन तर भेटले मात्र डॉक्टरांनी आज शस्त्रक्रिया होणार नाही, टीव्हीवर संप मिटला की बघा आणि या असं म्हणत त्यांना पुन्हा काही गोळ्या दिल्या.
'खूप त्रास होतो संप नको व्हायला'
दरम्यान हे वयस्कर जोडपं पुन्हा औरंगाबादला परतलं असून असे संप नको व्हायला आमच्यासारख्याला खूप त्रास होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. यावेळी आजीबाईसोबत आलेले शंकर वाघ म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी डॉक्टरांनी आम्हला गोळ्या दिल्या होत्या. शुगर कमी करा आणि पंधरा दिवसांनी या, ऑपरेशन करु सांगितले होते. औरंगाबादवरुन बारा वाजता आम्ही बसमध्ये बसलो आणि पहाटे पाच वाजता आलो. डॉक्टरांनी सांगितले की टीव्हीवर संप मिटला की बघा आणि या म्हणे आज गोळ्या दिल्या. ICU बाहेर झोपलो, थंडी वाजली खायला काही नाही, औरंगाबादला मुलाकडे जातो आता परत. संप मिटला की येऊ परत ऑपरेशन करु. खूप त्रास होतो संप नको व्हायला, खायची झोपायची काही सोय होत नाही, खूप त्रास होत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
