(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhagan Bhujbal : आरक्षण तर मिळालं, आम्ही 100 टक्के खुश नाही, भुजबळांनी सांगितल्या त्रुटी!
Chhagan Bhujbal : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) तर मिळालं, बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं पुढचं काम असल्याचे मत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
Chhagan Bhujbal : आमचा लढा दोन अडीच वर्षांचा नाही, मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेतून बाहेर पडलो आणि 91 साली समता परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून आमचा ओबीसींसाठी (OBC reservation) लढा सुरू आहे. अनेक वर्षांच्या लढाईनंतर आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. आरक्षण तर मिळालं, बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं पुढचं काम असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून ओबीसी आरक्षण मिळाल्यांनतर समता परिषदेच्या (Samata Parishad) वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, ओबीसी आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरु होता. आज या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आले आहे. आम्ही शिवसेना सोडल्यापासून ओबीसी आरक्षणाच्या मागे लागलो. अनेक ठिकाणी भेटी दिल्या, कोर्टात गेलो. आंदोलने, निदर्शने केली. शेवटी महाविकास आघाडी सरकार आलं. महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचे काम पूर्ण केले. आणि शिंदे, फडणवीस सरकारने ने पुढे नेले. त्यानंतर ओबीसी आरक्षण मिळाले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आम्ही 100 टक्के खुश नाही. ज्या ठिकाणी कमी डाटा दाखवलाय, तिथे राज्यसरकारने त्याची शहानिशा करावी. तसेच ओबीसींचे आरक्षण वाढवा, आकडा बदला ही राज्यसरकारकडे मागणी करणार असून ओबीसींना देशव्यापी 27 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात यापुढेही आमचं काम सुरूच राहणार असून येत्या जनगणनेत ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरणार आहोत. यापुढे बाठिया आयोगातील त्रुटी दूर करणं हे आता आमचं काम असेल, कारण सिन्नरमध्ये सरपंच, उपसरपंच ओबीसी असतानाही तिथे शून्य ओबीसी दाखवले, याबद्दल चौकशी करणार आहोत. ओबीसी समाजाला मिळालेल्या ओबीसी आरक्षणाचे श्रेय सर्वांचे असून महाविकास आघाडी, भाजप आणि अन्य पक्षांचेही, जे जे रस्त्यावर उतरले त्या सर्वांचे श्रेय असल्याचे ते म्हणाले.
ओबीसींची जनगणना महत्वाची
छगन भुजबळ यावेळी म्हणाले, मैदानातील लढाई अजून पुढे आहे, मात्र कायद्याच्या लढाईत काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. दिल्लीला ओबीसींचा मोठा मेळावा झाला, तेव्हा मी या सर्व गोष्टी मांडल्या. देशभराचे ओबीसींचे नेतृत्व मी करेल की नाही सांगता येत नाही पण देशभरात फिरलोय. जनगणना करा ही आमची मागणी आहे, बाकी वाढले पण आमची कमी झाली. कोरोना काळात आपण सर्व घरात होतो तेव्हा आम्ही ओबीसी ओबीसी करत बसलो असतो तर लोकांनी आमच्यावर टीका केली असती पण फडणवीसांनी नंतर आम्हाला सहकार्य केले आणि पुढेही त्यांनी करावे यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो. तसेच सध्या देण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणातील काही त्रुटी संदर्भात दिल्लीत जाऊन दूर करण्याची मागणी करणार आहोत.
राज्य सरकारचा केमिकल लोचा
राज्यातील सरकार स्थापनेनंतरची परिस्थिती पाहता अनेक प्रश्न तयार झाले आहेत. मुन्नाभाई मध्ये जसा संजय दत्त म्हणतो केमिकल लोचा झालाय तसा या केसमध्ये कानुनी लोचा तयार झाला असल्याचे भुजबळांनी सांगितले. विधिमंडळ नेता कुणी निवडायचा? आमदारांनी की पक्ष प्रमुखाने? यासह अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोनिया गांधी यांच्या ईडी कारवाई विषयी म्हणाले, ही कारवाई मला आवडलेली नाही, 10 वर्षे त्या यूपीए सरकारच्या अध्यक्ष होत्या, सध्या त्या विविध व्याधींनी ग्रस्त आहेत, अशा परिस्थितीत त्यांना त्रास देणं बरोबर नसल्याचे ते म्हणाले. तसेच त्र्यंबक तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेला पूल हा आदित्य ठाकरेंनी नाही जिल्हा परिषदेने उभारला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.