(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Mahavitaran : नाशिकच्या एकलहरे केंद्राचे कामगार उतरले संपात, वीजनिर्मितीला बाधा नाही, मात्र...
Nashik Mahavitaran : एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पचे कामगार संपात उतरल्याने मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Nashik Mahavitaran : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा (Power Supply) बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर दुसरीकडे नाशिकला (Nashik) वीजपुरवठा करणाऱ्या एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पचे कामगार संपात उतरल्याने मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र वरिष्ठ कर्मचारी आणि पर्यायी कामगाराच्या माध्यमातून सध्या वीजनिर्मितीचे कार्य सुरू असल्याचे समजते आहे.
राज्यातील महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी काल मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यात संपात जवळपास 39 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज पुरवठा करणारे एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पाचे 600 कामगार संपात उतरले आहेत. टाळ मृदूंग हाती घेत, विठ्ठल नामाचा गजर करत एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील सहाशे कर्मचारी महावितरणच्या संपात सहभागी झाले आहेत.
एकलहरे येथील औष्णिक विद्युत केंद्र गेल्या 43 वर्षांपासून कार्यरत आहे. 210 मेगावॅट क्षमतेचे दोन संच सध्या कार्यरत आहेत. त्यातून सुमारे 360 ते 400 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. मात्र मध्यरात्रीपासून महावितरण मंडळाने खासगीकरणाविरोधात संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे नाशिककारांमध्ये कालपासून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वेगवगेळ्या अफवा देखील यावेळी उपस्थित झाल्या आहेत. अशातच काल रात्री उशिरा नाशिक महावितरण कडून ग्राहकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज नाशिकला वीजपुरवठा करणारे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या सहाशे कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेत संपात सहभाग घेतला आहे.
दरम्यान संपात एकलहरे केंद्र परिसरात आंदोलन करण्यात येत असून सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात येत आहे. मात्र एकलहरे विद्युत केंद्रातील वरिष्ठ कर्मचारी आणि पर्यायी कामगाराच्या माध्यमातून सध्या वीजनिर्मितीचे कार्य सुरू आहे. अद्याप पर्यंत वीज निर्मितीला कोणतीही बाधा नाही, मात्र पुढील काळात वीज राहील कि नाही हे सांगता येणं अवघड असल्याचे सांगितले जात आहे. या संपाबाबत महावितरणने म्हटलं आहे की, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
नाशिककरांसाठी सूचना
दरम्यान नाशिकमधील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435, 1800-233-3435 , 1912 व 19120 यावर संपर्क साधावा. यासोबतच नाशिक मंडळातील ग्राहकांनी 7875357861 या क्रमांकावर तसेच मालेगाव मंडळातील ग्राहकांनी 7575653952 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन वीज वितरण मंडळाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :