(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकला अलर्ट, पोलीस प्रशासन सतर्क, सोशल मीडियावरही वॉच
Nashik News : राज्यातील दहशतवादी कारवायांच्या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस (Nashik Police) सतर्क झाले असून शहरासह नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nashik News : कोरोनानंतर (Corona) प्रथमच मोठ्या उत्साहात व भव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासह (Ganeshotsav) अन्य सण, उत्सव तसेच मुंबई वाहतूक पोलिसांना आलेले दहशतवादी हल्ल्यांचे (Terrorist Attack) मॅसेजेस, रायगडाच्या (Raigad) समुद्र किनाऱ्यावर बोटीत आढळून आलेली शस्रे या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस (Nashik Police) सतर्क झाले असून शहरासह नाशिक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मागील काही दिवसांत झालेल्या सत्तांतरामुळे तसेच आगामी गणेशोत्सव आणि इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून खबदारी घेण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील महत्वाच्या शहरांना खबरदारी घेण्यात येत आहे. नाशिकलाही गृहविभागाकडून हाय अलर्ट मिळाला आहे. अतिरिक्त महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात दीड ते दोन महिन्यात घडलेल्या सत्तांतरामुळे आगामी सण, उत्सवावर त्याचा प्रभाव आणि व राजकीय वर्चस्ववाद पाहयावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दहशतवादी हल्ल्यांच्या मुंबई पोलिसांना मिळालेल्या धमक्यांमुळे पोलिसांपुढील आव्हाने आगामी काळात वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सरंगल यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
नाशिक पोलीस आयुक्तालय येथे परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेण्यात आली. यावेळी नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय व गुप्तचर यंत्रणेकडून राज्यात राजकीय तेढ, सामाजिक तेढ निर्मण होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्थेची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनांवर असून परिक्षेत्रनिहाय परस्परांमध्ये असलेला समन्वय अधिकाधिक सक्षम करण्यावर भर द्यावा असेही सरंगल यांनी सांगितले.
सोशल मीडियावर नजर
नाशिक पोलिसांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर द्यावा. तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यातील सोशल मीडियावर नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले. सोशल मीडियावर असलेल्या आक्षेपार्य पोस्ट डिलीट करण्याचाही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष शाखा, गुप्तवार्ता सूचनांकडे लक्ष ठेवण्यासोबत, व्हीआयपी सुरक्षेचे तंतोतंत नियोजन करावे. पोलिसांच्या मानसिक, शारीरिक स्वास्थाकडेही लक्ष दिले जावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या.
नाशिकची जबाबदारी सरंगलांकडे....
राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने एकूण सात परिक्षेत्रांसाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची परिक्षेत्र निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसतर नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त व वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.