Nashik News : पंचवीशे किलो रंग, 2 हजार किलो रांगोळी, तीन तासांत साकारली 25 हजार स्वेअर फुटांची महारांगोळी
Nashik News : नाशिक येथील पाडवा पटांगण परिसरात ही (Maharangoli) 25 हजार स्वेअर फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे.
Nashik News : गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) निमित्ताने नाशिक शहरात पाच दिवशीय कार्यक्रमात आज तब्बल 25 हजार स्वेअर फुट महारांगोळी साकारण्यात आली. यासाठी 2500 किलो रंग आणि 2 हजार किलो रांगोळीचा वापर करण्यात आला असून 200 महिलांनी अवघ्या तीन तासांत ही महारांगोळी साकारली आहे. नाशिक येथील पाडवा पटांगण परिसरात ही भव्य रांगोळी (Maharangoli) साकारण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) महानगर पालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तिसऱ्या दिवशी अर्थात सोमवार पाडवा पटांगण पर्यावरण रक्षण (Enviroment) या अंतर्गत पंचमहाभुते या विषयाला अनुसरुन तब्बल 25 हजार स्क्वेअर फुटांची ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. 'पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते व त्याचे महत्व हे प्रत्येकाला आवर्जून समजावे या उद्देशाने व त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेने 'मी' चे 'आम्ही' मध्ये परावर्तन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत वृक्षतोड, वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, रासायनिक खतांचा अती वापर, जलप्रदूषण या गोष्टींचा अंतर्भाव असलेले रांगोळीचित्र रेखाटण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून वितळणारे बर्फ, पूर परिस्थिती, दुष्काळ, पृथ्वीचे वाढलेले तापमान हे नाविन्यपूर्ण पद्धतीने रांगोळीचित्रात रेखाटले आहेत.आणि या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून वृक्षारोपण, हरित उर्जेचा वापर, अग्निहोत्र, तुळस यासारख्या विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून वसुधैव कुटुंबकम् असे मोठ्या अक्षरात रेखाटले आहे.
दोन दिवस महारांगोळीचे प्रदर्शन
या महारांगोळीची संकल्पना पूर्णत्वास उतरवण्यासाठी निलेश देशपांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. यावेळी भारती सोनवणे यांनी महारांगोळी प्रमुख म्हणून काम पहिले तर मंजुषा नेरकर, सरोजिनी धानोरकर यांनी सहप्रमुख म्हणून काम पहिले. या महारांगोळीचा पहिला बिंदू हा काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम केलेल्या रामजी पाळजी मारू, यांच्या सूनबाई हिरुबेन धुडा मारू, राम पला मारू, दिपाली गीते यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आला. ही महारांगोळी पाडवा पटांगणावर दोन दिवसाकरिता ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी ती बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे.