Nashik Accident : मनमाडच्या जवानाचा एकुलत्या एक मुलासह कार अपघातात मृत्यू
Nashik Accident : नाशिकमधील एका कार अपघातात वडिलांचा आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : नाशिकमधून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका कार अपघातात जवानासह त्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. बाजीराव त्र्यंबक मिस्कर (38), साई (12) (हनुमान नगर, मनमाड) अशी मृत बाप-लेकांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मनमाड येथील रहिवाशी असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात पंजाबमधील हिस्सार येथे कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिस्कर हे भावाच्या वर्षश्राध्दासाठी सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकतेच मिस्कर त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. म्हणून मिस्कर कुटुंबीय जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी सोमवारी निघणार होते. मात्र जाण्यावरून बाजीराव यास मेहुण्याने विरोध दर्शवला. याचा राग येऊन जवान बाजीराव हा आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टोकारने रविवारी रात्रीच मनमाड येथून निघाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र रस्त्याने जात असतांना सोमवारी पहाटे नगरजवळ अल्टोकार आणि ट्रकचा अपघात भीषण झाला. अपघात इतका भयंकर होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी नागरिकांनी सांगितले आहे. या अपघाताची माहिती घरच्या कुटुंबाला कळताच त्यांनी तातडीने नगरकडे धाव घेतली. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे.
जवान बाजीराव मिस्कर हे गेल्या दहा दिवसांपूर्वी आपल्या भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आले होते. मात्र एकुलत्या एक मुलासह कार अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव आणि त्यांचे कुटुंब सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना भेटत होते. देव दर्शनासाठी जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
