(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद पुन्हा हादरलं! व्यापाऱ्याचा पत्नीसह कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
औरंगाबाद शहरात पुंडलीकनगर भागात पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Aurangabad Crime News: एकाच दिवसात तीन हत्यांच्या घटनेनंतर चर्चेत आलेलं औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हादरले आहे. शहरातील पुंडलिकनगर भागात राहत्या घरात पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनासथळी पोलिसांचे पथक दाखल झाले असून, मृतदेह उत्तर तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णलायत हलवण्यात येत आहे. हिरालाल कलंत्री ( 55 ) आणि किरण शामसुंदर कलंत्री (45) अशी मृतांची नावे आहेत.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ( सोमवारी ) कलंत्री यांच्या घरामधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पुंडलीकनगर पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनसथळी जाऊन पाहणी केली असता, पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हि खुनाची घटना असल्याचा संशय पोलिसांना आहे. तर त्यांचा मुलगा घटना घडल्यापासून फरार असून त्याचा फोन सुद्धा लागत नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास सुरु झाला आहे.
औरंगाबाद बनतोय 'क्राईम कॅपिटल'
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात खुनाच्या घटनेत वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 22 दिवसात औरंगाबाद शहरात सात खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले. त्यात आणखी पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने शहारत खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शहरात गुन्हेगारी वाढली...
मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना पाहायला मिळत असून, पोलिसांचा भीती उरली नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तर अनेक हत्येच्या गुन्हयात आरोपी असलेले तरुण नशेखोर असल्याचे समोर आले आहेत. तर काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे सुद्धा समोर आलंय.