Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष
Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ कुटुंबासह परदेशात गेले होते. ते आज नाशिकमध्ये परतणार आहेत.
Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यानंतर छगन भुजबळ हे आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज परदेशवारीनंतर ते नाशिकमध्ये परतणार आहेत.
मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असणाऱ्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना यंदा महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले आहे. ओबीसींनी यंदा महायुतीला आशीर्वाद दिला. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही मी होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.
छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परतणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ कुटुंबासह परदेशात गेले होते. ते परदेशवारीनंतर आज दुपारी नाशिकमधे पोहोचणार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने रात्री साडेनऊ वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत. तर उद्या सकाळी सातारा आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यात कार्यक्रमांना उपस्थित छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. परदेशातून परतल्यानंतर छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भुजबळांच्या भेटीनंतर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
दरम्यान, छगन भुजबळ यांनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, भुजबळ हे आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये त्यांच्या बद्दल सन्मानाची भावना आहे. स्वतः अजित पवार देखील त्यांची चिंता करतात. भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यावेळी भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितले की, आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावर आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे. त्यामुळे भुजबळांसारखा एक नेता ज्यांना देशाच्या अन्य राज्यात देखील मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे. मात्र, भुजबळांचे मत वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, या दृष्टीने आम्ही मार्ग काढू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
आणखी वाचा