नाशिकमध्ये पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपासह राष्ट्रवादीच्या आमदारांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण
Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आढावा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली आहे. मात्र या बैठकीला भाजप आमदारांनी दांडी मारल्याचे चित्र आहे.
Nashik News नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती. मात्र या बैठकीला भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दांडी मारल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सिंहस्थ आढावा बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी बैठक बोलावली होती.
जिल्ह्यात भाजपचे देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल आहेर, दिलीप बोरसे, असे एकूण पाच आमदार आहेत. मात्र भाजपच्या आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तसेच छगन भुजबळ आणि सुहास कांदे हेदेखील बैठकीला गैरहजर आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनंतर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समिती नेमण्यात आली आहे. तर सहअध्यक्ष म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे लोकप्रतिनिधी उपस्थित
सिंहस्थ आढावा बैठकीला नाशिकमध्ये सुरुवात झाली असून या बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नितिन पवार उपस्थित आहेत. दरम्यान सिंहस्थ आढावा बैठकीनंतर पाणी टंचाई बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शासन निर्णय गठीत
बैठकीनंतर दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका पार पडली. 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. याबाबत शासन निर्णय गठीत झाला आहे. नियोजनाच्या आरखाडाच्या बाबत बैठक झाली. केलेले कामकाज आणि सूचना आल्या आहेत. सामान्य नागरिकांच्या पण सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी अॅप तयार केले जाणार आहे. इतर राज्यात कुंभमेळा झाला तेथील अनुभवाची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे आराखडा तयार करण्यास मदत होईल.
नाशिकमध्ये तूर्तास पाणी कपात नाही
नाशिक जिल्ह्यात ऐन फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. याबाबत दादा भुसे म्हणाले की, पिण्याचे पाणी आणि गुरांसाठी चाऱ्याच्या बाबत तसेच रोजगाराबाबत आढावा घेतला आहे. पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था आणि इतर सुविधा या बाबत चर्चा झाली. त्यानुसार हे एकेएक विषय मार्गी लावले जातील. पिण्याच्या पाण्याबाबत ज्या योजना आहे त्या दर्जेदार झाल्या पाहिजे. वेळेत योजना पूर्ण व्हाव्यात. पाणी कपातीबाबत दादा भुसे म्हटले की, पिण्याचे पाणी आहे, सिंचनाचे पाणी ही उपलब्ध आहे. तरीही सूचना केली आहे. जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा अल निनो मुळे ऑगस्टपर्यंत नियोजन केले आहे. मे, जून, जुलैमध्ये पाण्याची तीव्रता वाढत जाते. आज कमी पाणी वापरू, पाणी जपून वापरा. पाणी वाचले तर शेतीला उपयोगी पडेल. नाशिक शहराला पाणी कमी पडणार नाही. सध्या पाणी कपातीचा घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा