Nashik news : नाशिक शहरात खुनाची मालिका सुरूच; अंबड परिसर पुन्हा हादरला, भरदिवसा भाजीविक्रेत्याला संपवलं!
Nashik News : मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची (Nashik) चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : एकीकडे नाशिक पोलीस (Nashik Police) सायबर दूतांच्या नेमणुकीसह शहरभर चौक बैठका आयोजित करत आहे. मात्र दुसरीकडे खुनाचे सत्र सुरूच असून अंबड परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पोलीस चौकीच्या काही अंतरावरच भाजीविक्रेत्याला संपविण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मागील पंधरा दिवसात नाशिकमध्ये खुनाची (Nashik Murder) चौथी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील अंबड भागात (Ambad) एका सराईत गुन्हेगाराला टोळीवादातून संपविण्यात आल्याची घटना घडली होती. अशातच याच परिसरात भरदिवसा नागरिकांच्या गर्दीत एका भाजीविक्रेत्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिक प्रचंड दहशतीखाली असल्याचे चित्र आहे. तर पोलिसही वारंवार घडणाऱ्या घटनांनी चक्रावले असून एक गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच दुसरी घटना घडत असल्याने पोलीस कुमक कमी पडते की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नाशिक शहरात (Nashik) पंधरा दिवसांत खुनाची चौथी घटना गुरुवारी भरदिवसा दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अंबड परिसरातील सिडको येथे शॉपिंग सेंटर जवळ शस्त्रधारी हल्लेखोरांनी भाजी विक्रेत्या तरुणावर सपासप वार करून ठार केले. संदीप आठवले (Sandeep Athwale) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चार ते सहा हल्लेखोरांनी भाजी विक्रेता संदीप याच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या खुनी हल्ल्याचा थरार येथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.
दरम्यान आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून हल्लेखोर फरार झाले. अंबड पोलिस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची दोन पथके तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. हल्लेखोरांना अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलिसांनी काही तासातच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
तीन तासात खूनाचा उलगडा
अवघ्या तीन तासात पोलिसांनी या खूनाचा उलगडा करुन पाच आरोपींना ताब्यात घेतले असून तीन आरोपी अद्याप फरार आहे. हा खून जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुख्य आरोपी ओम प्रकाश पवार उर्फ मोठा ओम्या खटकी याच्यासह ओम चौधरी उर्फ छोटा खटकी, साईनाथ गणेश मोरताटे उर्फ मॅग्गी मो-या, अनिल प्रजापती व पार्थ साठे यांना ताब्यात घेतले आहे. तर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे कायदा- सुव्यवस्था उरली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
इतर महत्वाची बातमी :