Narayan Gad Beed: नारायण गडावरील उत्तराधिकारी-विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर; आजच्या बैठकीत वादंग होण्याची शक्यता
Narayan Gad Beed: बीडच्या नारायण गडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत आला आहे.

Narayan Gad बीड: धाकटी पंढरी म्हणून राज्यात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायण गडाचा (NarayanGad Beed) वाद विकोपाला गेला आहे. बीडच्या नारायण गडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्तांमधील सदस्यांवरील आरोपांमुळे गड चर्चेत आला आहे.
सध्याचे महंत शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. यावरून वाद असल्याची चर्चा आहे. दरम्यान याच अनुषंघानं पंचक्रोशीतील ग्रामस्थांची आज सकाळी 11 वाजता व्यापक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वादंग होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.
बीड मधील नारायण गडाचे महत्व-
नारायण गड या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बारा वर्षाला एका शिवलिंगाची निर्मिती होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. या ठिकाणी जे संत महंत होऊन गेले, त्यांनी श्री शंभू महादेवाची तपश्चर्या केलेली आहे. या ठिकाणी नारायण महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. अशी एखाईका सांगितली जाते. जिल्ह्यातील जे धार्मिक गड आहेत. त्यातील नारायण गड हा महत्त्वाचा गड म्हणून ओळखला जातो.
- सध्याचे शिवाजी महाराज हे नववे महंत (मठाधिपती) आहेत.
- त्यांनी संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली.
- गुरू शिष्य परंपरेने उत्तराधिकारी नियुक्त केले जातात. याचे सर्वस्वी अधिकार हे महंतांना आहेत.
- नारायणगडावर गतवर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिला दसरा मेळावा घेतला आणि गडाला राजकीय किनार दिसून आली.
- मात्र सध्या शिवाजी महाराज यांनी नियुक्त केलेल्या उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील होत असलेल्या सदस्यांवरील आरोपामुळे गड चर्चेत आहे.
बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना मोठे महत्त्व-
बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना मोठे महत्त्व आहे. पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गड, श्री क्षेत्र नारायण गड, गहिनीनाथ गड, मच्छिंद्रनाथ गड आणि बीड अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भगवान गडाला मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु अलीकडच्या काळात याच गडावर राजकीय मंडळींची उपस्थिती राहिल्याने हे गड चर्चेत राहिले. आता महंत आणि विश्वस्तांच्या वादामुळे नारायण गड चर्चेत आला आहे.























