Nandurbar Rain : नंदूरबार जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप, अनेक भागात शेती पिकांना फायदा, तर काही ठिकाणी नुकसान
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक भागात हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
Nandurbar Rain : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) कोसळत आहे. काही ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील रात्रभर पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक भागात हा पाऊस पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर काही ठिकाणी या पावसामुळं शेती पिकांचे नुकसानही झालं आहे. दरम्यान, आजही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत
नंदूरबार जिल्ह्यात पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. तर दुसरीकडं पावसामुळं शेती पिकांचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर येत आहेत. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये जोरदार पाऊस झाला असून नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस पडत आहे. मुंबईसह, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेर लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: