Cotton Price : निवडणुकीमुळं गुजरातमध्ये कापसाची खरेदी मंदावली, महाराष्ट्रात दरात घसरण, नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांकडून विक्री बंद
Cotton Price : विधानसभा निवडणुकीमुळं गुजरातमध्ये कापसाची (Cotton) खरेदी मंदावली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कापसाच्या दरावर होत आहे.
![Cotton Price : निवडणुकीमुळं गुजरातमध्ये कापसाची खरेदी मंदावली, महाराष्ट्रात दरात घसरण, नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांकडून विक्री बंद Cotton purchase slows down in Gujarat due to assembly elections, cotton prices fall in Maharashtra Cotton Price : निवडणुकीमुळं गुजरातमध्ये कापसाची खरेदी मंदावली, महाराष्ट्रात दरात घसरण, नंदूरबारमध्ये शेतकऱ्यांकडून विक्री बंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/10/0ad67d67b40cbfa6ddd015f93571ba0a1657446666_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cotton Price News : सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Elections) रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कापसाची (Cotton) खरेदी मंदावली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील कापसाच्या दरावर होत आहे. सध्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक झाल्यानं दरात दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
नंदूरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कापसाची विक्री बंद
दरवर्षी उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. यावर्षी नंदूरबार ( Nandurbar) जिल्ह्यात एक लाख 25 हजारपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला कापसाला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कापसाच्या दरात घसरण झाली आहे. सुरुवातीला कापसाचा 9 हजार ते 9 हजार 700 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळात होता. मात्र, गेल्या 15 दिवसात कापसाच्या दरात 1 हजार 500 ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. कापसाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी तात्पुरती कापसाची विक्री बंद केल्याचे चित्र नंदूरबार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
गुजरात निवडणुकीनंतर कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
कापूस खरेदीच्या मुख्य बाजारपेठा या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात आहेत. सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कापसाची खरेदी विक्री मंदावली आहे. त्याचा परिणाम कापसाच्या दरावर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबतची माहिती शेती क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कापूस मार्केटमध्ये व्यवहार मंदावले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कापसाची आवक वाढली आहे. आवक वाढल्यानं दर कमी झाले आहेत. मात्र, गुजरात निवडणुकीच्यानंतर कापसाचे दर वाढण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
पावसाचा शेती पिकांना मोठा फटका
सध्या कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी (Rain) झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. कापसासह सोयाबीन पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. या पावसातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली आहेत. सध्या काही ठिकाणी कापूस काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कापसाची काढणी सुरु आहे. मात्र, या वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा आहे. तर दुसरीकडं मजुरांअभावी कापूस वेचणीत खोडा येत असल्याचे चित्र आहे. अशातच आता दरांमध्ये देखील घसरण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Nandurbar : वेचणीसाठी आलेल्या कापसावर चोरांचा डोळा, तर दुसरीकडे मजुरांअभावी कापूस वेचणीला खोडा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)