(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : नंदुरबार बाजार समितीत दोन लाख क्विंटल लाल मिरचीची खरेदी, पुढच्या महिन्यात आवक वाढणार, वाचा किती मिळाला दर
Agriculture News : नंदुरबार बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी सुरु आहे. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी करण्यात आली आहे.
Agriculture News : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ (chilli Market) म्हणून नंदुरबार बाजार समितीची (Nandurbar Market Committee) ओळख आहे. सध्या या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी सुरु आहे. यावर्षी फेब्रुवारी अखेरपर्यंत बाजारात दोन लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची (Red chilli) खरेदी करण्यात आली आहे. मार्च महिन्यात 25 हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Climate Change : काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा मिरची पिकाला फटका
मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार बाजार समितीत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी केली जात आहे. आत्तापर्यंत मिरची खरेदीचा दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. या हंगामात सुरुवातीपासूनच आवक वाढली होती. मात्र, बदलत्या हवामानाचा मोठा फटका मिरची पिकाला बसेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. काही प्रमाणावर मिरचीच्या उत्पन्नात घटही झाली आहे. वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या महिन्यात नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी तर पावसानेही हजेरी लावली होती. तर कुठे थंडीचा कडाका वाढला होता. याचा परिणाम मिरचीच्या पिकावर (Chili Crop) झाला होता. उत्पादनात घट झाली असली तरी आतापर्यंत दोन लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. तर आणखीन वीस ते पंचवीस हजार क्विंटल मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे.
Chilli Price : ओल्या लाल मिरचीला तीन ते साडेपाच हजार रुपयापर्यंतचा दर
नंदुरबार बाजार बाजार समितीत (Nandurbar Market Committee) सुरुवातीला ओल्या लाल मिरचीला चार हजारांपासून ते दहा हजार रुपयापर्यंतचा भाव मिळाला होता. मात्र, आवक वाढल्यानं मिरचीचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर आहेत. सध्या ओल्या लाल मिरचीला तीन हजार रुपयापासून ते 5 हजार 500 रुपयापर्यंतचा दर दिला जात आहे. कोरड्या लाल मिरचीला आठ हजार ते 15 हजार रुपयांचा दर मिळत आहे. मिरचीचा हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळं हळूहळू आता आवक कमी होणार आहे. मात्र, यावर्षी मिरचीचे उत्पन्न चांगलं झालं होतं. त्यामुळं पुढील हंगामात देखील मिरचीची लागवड चांगल्या प्रमाणावर होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture News : मिरचीच्या उत्पादनात वाढ, धर्माबादमध्ये मोठी आवक; दराचा 'ठसका' कायम