Nanded: शस्त्रक्रिया विभागात उंदरानं रुग्णाच्या पायाला कुरतडलं, नांदेड शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Nanded :नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आयसीयू मध्ये एका रुग्णाच्या पायाला उंदीर कुरतडल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .

Nanded : शासकीय रुग्णालयातील ICU मध्ये एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. शासकीय रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याची धक्कादायक घटना घडली असून रुग्णाच्या जीविताशी खेळल्याच्या प्रकारानंतर आमदार बोढारकर यांनी भेट देत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलंय .
नेमकं घडलं काय?
शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडले. नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी 20 जुलै रोजी ते रुग्णालयात भरती झाले होते. 21 जुलैच्या पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला. त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला.
शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील अस्वच्छता पाहून बोनढारकर यांनी धारेवर धरले. या घटणेबाबत बैठक घेउन दोषीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार बोनढारकर म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकले !
शस्त्रक्रिया विभागातील या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक संजय पेरके यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. उंदरांना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आल्याचे पेरके म्हणाले. शस्त्रक्रिया विभागात उंदराने रुग्णाला चावा घेणे हा गंभीर प्रकार आहे. पण जिल्हा शल्य चिकित्सकांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. उंदराने रुग्णाच्या पायाला कुरतडल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची अभ्रू वेशीला टांगली गेलीय. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
























