Nanded : डांबराच्या जमिनीत झाडं लावण्याचा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय आणि कंत्राटदाराचा प्रताप
नियम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने चक्क वाळलेल्या झाडांची लागवड केल्याचं समोर आलं आहे. मातीऐवजी डांबराच्या जमिनीत या झाडांची लागवड करण्यात आली आहे.
नांदेड: जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात, नियमांची पूर्तता करण्यासाठी थातूरमातूर कामे करण्याचा सपाटा नांदेड राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने सध्या सुरू केला आहे. कंत्राटदारधार्जिण्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या बाजूने कामे पूर्ण करण्याचा सपाटा सध्या लावल्याचं चित्र आहे.
नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या नांदेड-नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग 361 चे रुंदीकरण करतेवेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत असणारी झाडे तोंडण्यात आली. ज्यात या महामार्गावर असणारी वड, लिंब, पिंपळ, चिंच,आंबा अशा विविध प्रजातीची भारतीय झाडांची रुंदीकरणात मोठी कत्तल करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग पूर्णत्वास आल्यानंतर कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदारधार्जिण्या नांदेड नॅशनल हायवे कार्यालयाकडून कंत्राटदाराच्या सोयीनुसार थातूरमातूर कामे करून घेतली जात आहेत. ज्यात चक्क डांबराच्या जमिनीत झाड लावण्याचा प्रताप कल्याण टोल कन्स्ट्रक्शन कंपनीने केला आहे.
दरम्यान कल्याण टोल कंपनीच्या कंत्राटदाराकडून नियम पूर्ण करण्यासाठी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रताप केला आहे. ज्यात भारतीय वंशाची झाडे न लावता, तीही झाडे मातीत न लावता डांबर चक्क डांबरात लावली आहेत. अगोदरच मातीतील झाडे बड्या परिश्रमाने तग धरतात, पण डांबरातील ही झाडे काहीच दिवसात वाळूनही गेली आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून कंत्राटदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांविषयी संताप व्यक्त केल्या जातोय.
खरे तर महामार्ग रुंदीकरण काम पूर्ण झाल्यानंतर,वातावरणाच्या संतुलनासाठी झालेल्या वृक्षतोडीपेक्षा चारपट वृक्ष लागवड होणे अपेक्षित आहे. तसेच जी भारतीय वंशाची आणि शेकडो वर्षे टिकणारी वड, पिंपळ, चिंच, आंबा, कडुनिंब ही झाडे लावणे गरजेचे आहे. परंतु नांदेड -नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग 361 च्या रुंदीकरणाच्या कामात नॅशनल हायवे कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणा आणि कंत्राटदारधार्जिण्या वृत्तीमुळे विदेशी झाडे लावण्याचा प्रताप करण्यात आलाय. तर मधोमध लावलेली झाडे मातीत न लावल्याने वाळली असून दुतर्फा असणारी झाडे लावण्याचा तर थांगपत्ताही नाही. याविषयी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. त्यामुळे हजारो वृक्षतोड केलेल्या कंत्राटदारामुळे नांदेड-नागपूर-तुळजापूर या 800 किमीच्या अंतरावरील पर्यावरणाचा मात्र ऱ्हास झालाय हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या :
- Pankaja Munde : माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल, पंकजा मुंडेंची खदखद
- Supreme Court on Freebies distribution : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी अवैधचे वैध करतात, फ्री स्कीम्सवरून सरन्यायाधीशांचे कडक ताशेरे! निवडणूक आयोगालाही फटकारले
- Raksha Bandhan : भावना गवळींनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, फेसबुकवर पोस्ट केला फोटो