Nanded News : नांदेड जिल्ह्यात सापांच्या 22 प्रजाती; 'या' चार जाती विषारी, जाऊ शकतो जीव
Nanded : नांदेड शहर आणि परिसरात मागील काही दिवसांत 28 हून अधिक साप पकडून सर्पमित्रांनी त्यास मानवी वस्तीपासून दूर नेऊन सोडले आहेत.
Nanded News : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, ठिकठिकाणी साप (Snake) आढळल्याचे प्रमाणही आढळले आहे. पाऊस पडल्यामुळे सापांना राहण्यासाठी असणारे बिळे बंद होतात. त्यामुळे त्यांनी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. नांदेड (Nanded) शहर व परिसरात मागील काही दिवसांत 28 हून अधिक साप पकडून सर्पमित्रांनी त्यास मानवी वस्तीपासून दूर नेऊन सोडले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 22 सापांच्या प्रजाती असून, यातील चार जाती विषारी आहेत. त्यामुळे त्यांनी चावा घेतल्यास माणसाचा जीव जाऊ शकतो.
नांदेड परिसरात धामन, धुळनागीन, नानेटी, तस्कर, डुरक्या घोणस, गवत्या इत्यादी बिनविषारी साप आढळतात. तर नाग, मन्यार, घोणस, फुरसे आणि पोवळा हे विषारी जातीचे साप आढळून आले आहेत. पावसाळा सुरू झाला की, मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे सापांना मारण्याच्या आणि सर्पदंशाच्या घटना वाढतात. या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता सर्पमित्रांची मदत घ्यावी. साप घरात आल्यास न घाबरता, त्याला न मारता आपल्या जवळच्या सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर लक्ष ठेवावे. सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विषारी प्रजाती केवळ चार
नाग : हा विषारी साप आहे. नागाची ओळख त्याच्या फणावरून होते. नाग हा जंगल, शेतासह मानवी वस्तीत देखील आढळतो. नागाचा दंश झाल्यावर एक ते दोन तासात उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावतो.
घोणस : या सापाच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. या खुणावरून हा साप ओळखता येतो. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग या छटामध्ये आढळतात.
मण्यार : घराच्या जवळपास बागेत, गवतात, पडक्या इमारतीत मण्यार आढळतो. रात्रीच्या वेळी हा साप मोठ्या प्रमाणात आढळतो. अन्न शोधण्यासाठी तो रात्री बाहेर पडत असतो.
फुरसे : साप आकाराने लहान आहे. फुरसाचा रंग तपकिरी व फिकट पिवळसर असून तपकिरी भागावर पांढरे ठिपके असतात. पाठीच्या दोन्ही बाजूवर एक-एक पांढरी नागमोडी रेषा असते.
पावसाळ्यात साप जास्त का दिसतात?
पाऊस सुरु झाल्यावर या काळात साप दिसण्याचे प्रमाण वाढते. कारण पाऊस पडल्यामुळे सापांना राहण्यासाठी असणारे बिळे बंद होतात. अनेकदा बिळात पाणी गेल्याने साप बाहेर पडतात. त्यामुळे अशावेळी ते आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवितात असे सर्प मित्र प्रसाद शिंदे यांनी सांगितले. तर सर्पदंश झाल्यावर माणूस हा 100 टक्के वाचू शकतो. त्यासाठी प्रथमोपचार घेतले पाहिजे. तसेच मांत्रिकाकडे न जात वैद्यकीय उपचार घ्यावे असे आव्हान देखील प्रसाद शिंदे यांनी केले आहे.