(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News: 'देव तारी त्याला कोण मारी'! टिप्परखाली अडकला अन् जॅक लावून जीव वाचवला
Nanded Accident News: या आगळ्यावेगळ्या अपघाताची (Accident) शहरभर चर्चा पाहायला मिळाली.
Nanded Accident News: 'देव तारी त्याला कोण मारी' असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र नांदेड शहरात (Nanded City) शनिवारी याचा प्रत्यक्षात प्रत्यय आला आहे. शहरातील सिडको भागातील रमाईमाता चौकात एका टिप्परने दुचाकीस्वारास जबर धडक दिली. ज्यात दुचाकीस्वार थेट टिप्परच्या खाली जाऊन अडकला होता. त्यामुळे टिप्परखाली अडकलेल्या दुचाकीस्वारास चक्क जॅक लावून बाहेर काढण्यात आले. तर या आगळ्यावेगळ्या अपघाताची (Accident) शहरभर चर्चा पाहायला मिळाली.
अधिक माहिती अशी की, शहरातील सिडको भागातील रमाईमाता चौकातील उस्माननगर रस्त्यावर शनिवारी दुपारच्या सुमारास दुचाकी क्र. एम एच 26 बि.एस. 3741 या दुचाकीस समोरुन येणाऱ्या एमएच 20 ईजी 9062 हायवा टिप्परने जबर धडक दिली. यात रंगराव मोरोतराव पुयड (वय 45 वर्षे,रा. नागेली) हे दुचाकीसह टिप्परखाली अडकले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली. पुयड हे टिप्परखाली अडकल्याने त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पुयड यांना वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आणि अखेर नागरीक व पोलिसांच्या मदतीने टिप्परच्या इंजिनला जॅक लावून वर उचलण्यात आले. त्यानंतर जखमी पुयड यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, सुदैवाने त्यांना कोणतेही गंभीर ईजा झाली नाही.
काहीवेळ वाहतूक ठप्प
प्रसंगावधान दाखवत नागरिक आणि पोलिसांनी टिप्परला जॅक लावून उचलले. त्यामुळेच पुयड यांचा जीव वाचू शकला. या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. दरम्यान, नांदेड उस्माननगर रस्त्यावर काहीवेळ वाहतुक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सहकाऱ्यांसोबत वाहतुक सुरळीत केली. गर्दीतून दोन रुग्णवाहिकांना वाटही करुन दिली.
'देव तारी त्याला कोण मारी'
रंगराव पुयड हे आपल्या दुचाकीवरून जात असतांना त्यांना एका हायवा टिप्परने जबर धडक दिली. या अपघातात त्यांची दुचाकी स्लीप होऊन थेट टिप्परच्या समोरच्या बाजूला खाली जाऊन अडकली. पण टिप्परच्या खाली स्पेस असल्याने सुदैवाने पुयड यांना गंभीर जखम झाली नाही. मात्र टिप्परच्याखाली ते अडकले. त्यामुळे त्यांना कसे काढायचा असा प्रश्न पडला होता. अखेर काहींना कल्पना सुचली आणि जॅक लावण्यात आले. त्यामुळे रंगराव पुयड यांचा जीव वाचला. टिप्परखाली जाऊन देखील रंगराव पुयड हे सुखरूप बाहेर पडल्याने, 'देव तारी त्याला कोण मारी'अशी चर्चा यावेळी पाहायला मिळाली.